आग्राव दर्यासागर मित्रमंडळाकडून आयोजन, कोळी बांधवाच्या उत्साहाला येणार उधाण

साळावच्या खाडीत शिडाच्या होड्यांच्या शर्यतीचा थरार
आग्राव दर्यासागर मित्रमंडळाकडून आयोजन, कोळी बांधवाच्या उत्साहाला येणार उधाण
रेवदंडा : महेंद्र खैरे
अलिबाग तालुक्यातील आग्राव पुर्वपाडा दर्यासागर मित्रमंडळाने गुढीपाडव्याच्या दुसरा दिवशी शिडवाल्या होंड्यांची स्पर्धेची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे. कार्लाच्या डोंगरातील एकविरा माता कोळी बांधवाचे श्रध्दास्थान, या एकविरा मातेला नवसाचा नारळ पुर्वी कुंडलिका समुद्रखाडीमार्गे भिसे खिंडीतून एकविरा कार्लाला पालखीने पोहोचविला जात असे. त्यातूनच या शिडाच्या होड्यांच्या शर्यतींचा जन्म झाला.
एकविरा मातेच्या या नवसाचा नारळ ओटीसह पालखी असंख्य होंडयासह कुंडलिका समुद्र खाडीमार्गे सुध्दा जात असत. बदलत्या काळात दळणवळणाच्या वाढलेल्या सुविधेने एकविरा मातेचा नवसाच्या नारळ, ओटीचा मार्ग बदलला. त्यावेळी पालखीस देवीच्या नवसाचा नारळ ओटी पोहोचविण्याना सुरू झालेली शिडवाल्या होंडयांच्या शर्यतीची परंपरा आजमितिस सुरू आहे. कोळी बांधव या दिवशी होंड्यांना रंगबिरंगी पताकांनी सजवून आप्त व मित्रमंडळीस कुंडलिका साळाव समुद्र खाडीत यांत्रीक होंड्यासह मौजमज्जेची लयलूट करतात. या दिवशी रेवदंडा, कोर्लई, बोर्ली, थेरोंडा पंचक्रोशीतीत कोळी बांधवाच्या यांत्रिक होंड्या मोठया संख्येने समुद्र खाडीत येतात. तसेच स्थानिकांसह पर्यटक सुध्दा मोठ्या संख्येने या शिडवाल्या होंड्यांच्या शर्यतीचा आनंद घेतात.मोठ्या संख्येने आलेल्या यांत्रिक होंड्यांची एक प्रकारे जत्राच भरल्याचे चित्र पहावयास मिळते, सोबतीला वेधुंद होत गितांच्या,वाद्यांच्या तालावर थिरकणारे कोळी बांधव दिसतात.
सजवलेल्या हॉड्यांतून कोळी बांधव व भगिनी बेधुंदपणे नाच आणी गाणे यांना भरती येउन कुंडलिका समुद्र खाडीला उत्साहाचे उधाण दिसते. आग्राव दर्यासागर मित्रमंडळाचे पंरपरेने चालणारी शिडवाल्या होंड्यांची शर्यतीची परंपरा संपुर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. आग्राव येथील समुद्र जेटी नजीक शिडवाल्या होंड्यांची शर्यत मान्यवरांचे हस्ते निशाण फडकवून व फटाके वाजवून होते. खाडीच्या पुर्वेला काही अंतरावरी विशेष खुणेच्या अंतरावरून होंड्यामागे फिरतात. शिडवाल्या होंड्या जाताना सहज वाऱ्यावर जातात, परंतू फिरताना कोळी नाखवाचे कसब दिसून येते. या फिरलेल्या होंड्या थेट रेवदंडा पुल व तेथून पुन्हा आग्राव जेटी असे मार्गक्रमण करतात. या शिडवाल्या होंड्यांतील शर्यतीत प्रथम, व्दितीय, तृतीय, उत्तेजनार्थ अशी मोठी बक्षीसे व चषक आग्राव गावात बक्षिस वितरण कार्यक्रमांत मान्यवर मंडळीच्या हस्ते देण्यात येतो. प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आग्राव गावात कार्ला एकविरा देवीचा नारळ व पालखी फिरवतात, यावेळी मोठ्या श्रध्दा व भक्तीने या पालखीचे स्वागत घराघरातून केले जाते. या निमित्ताने संपुर्ण आग्राव गावात गुढी पाडवा उत्सव दोन दिवस साजरा केला जातो. गुढी पाडव्याला घराला उभारलेल्या गुढी दोन दिवसांनी उतरवितात, आग्राव पुर्वपाडा दर्यासागर मित्रमंडळाचे शिडवाल्या होडयांच्या शर्यतीच्या आयोजनातून पुर्वपार संस्कृतीचे जतन करते.


