खानाव येथील साकव पुलाच्या नव्या कामाला प्रारंभ; ग्रामस्थांना दिलासा जि.प. सदस्य अनंत गोंधळी यांच्या पाठपुराव्याला यश, १५ ते २० दिवसांत काम पूर्ण होण्याची अपेक्षा
खानाव येथील साकव पुलाच्या नव्या कामाला प्रारंभ; ग्रामस्थांना दिलासा
जि.प. सदस्य अनंत गोंधळी यांच्या पाठपुराव्याला यश, १५ ते २० दिवसांत काम पूर्ण होण्याची अपेक्षा
रेवदंडा | प्रतिनिधी
अलिबाग-रोहा मुख्य मार्गावरील खानाव येथील धोकादायक बनलेल्या साकव पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाला अखेर प्रारंभ झाला असून, या कामाचा शुभारंभ शिवसेना अलिबाग तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी आणि ठेकेदार उपस्थित होते.
अलिबाग-रोहा मुख्य रस्ता नुकताच नव्याने तयार करण्यात आला असला, तरी खानाव येथील साकव पुलाला ऐन पावसाळ्यात भगदाड पडल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या भगदाडामुळे घडलेल्या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.
या पार्श्वभूमीवर जि.प. सदस्य अनंत गोंधळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून कामाला गती दिली. तसेच काम सुरू होण्यासाठी आवश्यक ते सहकार्यही त्यांनी उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले.
कामाचा शुभारंभ करताना ठेकेदारांनी पुलाच्या नूतनीकरणासाठी अनंत गोंधळी यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले. त्यांच्या सहकार्यामुळेच हे काम हाती घेणे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच साकव पुलाचे बांधकाम येत्या १५ ते २० दिवसांत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या पुलाच्या कामामुळे अलिबाग-रोहा मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यास मदत होणार असून, खानावसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शुभारंभ प्रसंगी खानाव गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
