रेवदंडा पोलीस ठाण्याचे नवे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांची अलिबाग पंचायत समिती सदस्य संतोष निगडे यांनी घेतली सदिच्छा भेट

रेवदंडा पोलीस ठाण्याचे नवे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांची अलिबाग पंचायत समिती सदस्य संतोष निगडे यांनी घेतली सदिच्छा भेट
रेवदंडा | महेंद्र खैरे
रेवदंडा पोलीस ठाण्याचे नवे प्रभारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित सुमन शिवाजीराव गडदे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अलिबाग पंचायत समिती काविर गण सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यापूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात यशस्वीपणे सेवा बजावली असून, अलिबाग तालुक्यातील सामाजिक व राजकीय परिस्थितीची त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखण्यात त्यांचा अनुभव निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी संतोष निगडे यांनी सुजित गडदे यांच्याशी परिसरातील विविध सामाजिक, सार्वजनिक आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित विषयांवर चर्चा केली. तसेच रेवदंडा परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिक यांच्यात समन्वय वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी रेवदंडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून, आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. नागरिकांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पोलीस पाटील दिनेश राऊत, ग्रामस्थ अनिल गावंड, मंदार मिसाळ, राजेंद्र फुंडे, भरत तुरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उमदे, युवा आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सुजित गडदे यांच्या नियुक्तीमुळे रेवदंडा पोलीस ठाण्याच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे यांनी व्यक्त केला.
