उमटे धरणाचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घ्या; डॉ. सचिन राऊळ यांची मागणी
उमटे धरणाचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घ्या; डॉ. सचिन राऊळ यांची मागणी
४६ गावे, ३३ आदिवासी वाड्यांच्या पाणीप्रश्नी सविस्तर चर्चा करण्याची विनंती
रेवदंडा | प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. सचिन शरद राऊळ यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्याकडे निवेदन सादर करून आगामी सर्वसाधारण सभेत उमटे धरणाचा विषय प्राधान्याने चर्चेस घेण्याची मागणी केली आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आणि धरणातील गाळ काढण्यासंदर्भातील प्रलंबित कामांवर सभागृहात सविस्तर चर्चा होऊन प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
डॉ. राऊळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, उमटे धरणावर ४६ गावे आणि ३३ आदिवासी वाड्यांतील हजारो नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसेच शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. त्यामुळे हा विषय केवळ विकासाचा नसून नागरिकांच्या जीवनाशी निगडित असल्याने त्यावर तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे.
धरणातील गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण प्रशासनाकडून सांगितले जात असले, तरी शासनाकडे निधी मिळविण्यासाठी आजपर्यंत कोणते प्रयत्न करण्यात आले, याची सविस्तर माहिती सभागृहात मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासोबतच सन १९९५ पासून शासनाकडे किती वेळा निधीची मागणी करण्यात आली, किती निधी मंजूर झाला, त्यापैकी किती खर्च करण्यात आला, जलसंपदा विभाग किंवा इतर विभागांकडे कोणते प्रस्ताव पाठविण्यात आले, धरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला का तसेच वरिष्ठ स्तरावर झालेल्या बैठका व त्यातील निर्णयांची माहिती सभागृहासमोर सादर करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
डॉ. राऊळ यांनी धरणावर बसविण्यात आलेल्या वॉटर फिल्टरमुळे पाण्याचा दाब कमी होऊन अनेक गावांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दाही उपस्थित केला. योग्य क्षमतेचा फिल्टर न बसविता सार्वजनिक निधी खर्च झाला असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.
जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध नसल्यास शासन व जलसंपदा विभागाकडे तातडीने प्रस्ताव पाठवून आवश्यक निधी मंजूर करून घेण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी करत उमटे धरणाच्या प्रश्नावर आगामी सर्वसाधारण सभेत सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा डॉ. सचिन राऊळ यांनी व्यक्त केली आहे.
