ताज्याघडामोडी

रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रायगड डीसीसी बँकेच्या कामकाजाचे कौतुक

रेवदंडा | महेंद्र खैरे
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अलिबाग येथील मुख्य कार्यालयाला भेट देत बँकेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. वित्तीय समावेशन, ग्रामीण भागातील बँकिंग सेवांचा विस्तार, सहकारी संस्थांचे सक्षमीकरण, आधुनिक बँकिंग व्यवस्था आणि व्यवसायवृद्धीसाठी बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामाचे यावेळी कौतुक करण्यात आले.

रिझर्व्ह बँकेच्या डिपार्टमेंट ऑफ रेग्युलेशनचे जनरल मॅनेजर विकासकुमार साहू, असिस्टंट जनरल मॅनेजर धनंजय भासे व शैलेश इंगळे यांच्या शिष्टमंडळाने रायगड डीसीसी बँकेच्या केंद्र कार्यालयासह विविध सहकारी संस्थांना भेट दिली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी बँकेच्या वाटचालीचे आणि विविध उपक्रमांचे सविस्तर सादरीकरण केले. नाबार्डच्या महाराष्ट्र रिजनल ऑफिसचे एजीएम नवल कन्नोर तसेच बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे उपस्थित होते.

वित्तीय समावेशनाच्या क्षेत्रातील बँकेच्या कामाची विशेष दखल घेत विकासकुमार साहू यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे कौतुक केले. ग्रामीण उद्योजकता, स्वयंरोजगार, सूक्ष्म उद्योग तसेच २० हजारांहून अधिक महिला बचतगटांना बँकेने दिलेले पाठबळ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी कशेळे, मजगाव, नाते, विन्हेरे, विळे, राजपुरी, संदेरी आदी भागांत शाखांचा विस्तार करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाला औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचा हा प्रयत्न वित्तीय समावेशनाचा प्रभावी नमुना असल्याचे साहू यांनी सांगितले.

दरम्यान, बँकेच्या ८ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यवसायाचा, सातत्यपूर्ण व्यवसायवृद्धीचा तसेच आधुनिक बँकिंग सेवा, डिजिटल परिवर्तन, रिस्क मॅनेजमेंट, सायबर सुरक्षा, ग्राहकाभिमुख सेवा आणि नियामक अपेक्षांनुसार विकसित केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी बँकेने राबविलेल्या विविध उपक्रमांचेही यावेळी कौतुक झाले. सहकारी संस्थांचे संगणकीकरण करून त्यांना आधुनिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचा पुढाकार देशात सर्वप्रथम घेणाऱ्या बँकांपैकी रायगड डीसीसी बँकेचे कार्य सहकार क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरू शकते, असे साहू यांनी मत व्यक्त केले.

“सहकारी बँकांनी व्यवसायवृद्धीसोबतच वित्तीय समावेशन, संस्थात्मक सक्षमीकरण आणि गुणवत्तापूर्ण बँकिंग सेवांवर सातत्याने भर देणे आवश्यक आहे. बदलत्या बँकिंग व्यवस्थेशी सुसंगतपणे स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा रायगड डीसीसी बँकेचा दृष्टिकोन प्रशंसनीय आहे,” असे विकासकुमार साहू यांनी सांगितले.

या यशामागे बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे विकासाभिमुख नेतृत्व, संचालक मंडळ व व्यवस्थापनाची दूरदृष्टी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचेही त्यांनी गौरवाने नमूद केले.

आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा ॲनालिटिक्स, डिजिटल गव्हर्नन्स, सक्षम सायबर सुरक्षा आणि आधुनिक बँकिंग तंत्रज्ञानाचा वापर वाढवून ग्राहकांना अधिक सुरक्षित, जलद व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा बँकेचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सहकारी संस्थांसाठी रायगड डीसीसी बँकेने उभारलेले कार्य देशासाठी ‘रोल मॉडेल’ ठरू शकते, असे मत व्यक्त करत विकासकुमार साहू यांनी बँकेचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *