ताज्याघडामोडी

नागाव-बदामी बीच रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात

 

नागाव-बदामी बीच रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात
६.५० लाखांचा निधी; ग्रामस्थांसह पर्यटकांना होणार मोठा फायदा

रेवदंडा | प्रतिनिधी : नागाव-बदामी बीचकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या बहुप्रतीक्षित कामाला अखेर सुरुवात झाली आहे. ग्रामस्थांची गरज आणि पर्यटकांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन ग्रामपंचायत नागावच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले आहे.

रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत नागावच्या सरपंच सौ. हर्षदा निखिल मयेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. सचिन राऊळ, ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रियांका काठे, सौ. शांभवी म्हात्रे, श्री. परेश ठाकूर, सौ. वीणा पिंपळे तसेच ग्रामस्थ श्री. मनोहर ठाकूर, श्री. पद्माकर गुरव, श्री. राजेंद्र ठाकूर, श्री. अरुण गुरव, श्री. अनिल मानकर, श्री. अक्षय मानकर, श्री. अभिषेक नाईक, श्री. शुभम गुरव यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

सुमारे २५० ते ३०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी पंधराव्या वित्त आयोगातून १.५० लाख रुपये, तर ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून ५ लाख रुपये, असा एकूण ६.५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

बदामी बीचकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असून, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ तसेच पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होण्यासोबतच परिसरातील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या कामासाठी सरपंच सौ. हर्षदा निखिल मयेकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेतला. ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत रस्ते व इतर पायाभूत सुविधांची कामे मार्गी लावण्यावर ग्रामपंचायतीचा भर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *