ताज्याघडामोडी

रेवदंड्यात अल्पवयीन मुलाकडून इन्स्टाग्रामवर अश्लील व्हिडीओ प्रसारित; गुन्हा दाखल

रेवदंड्यात अल्पवयीन मुलाकडून इन्स्टाग्रामवर अश्लील व्हिडीओ प्रसारित; गुन्हा दाखल

बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री प्रसारित केल्याचा आरोप; पालकांनी मुलांच्या मोबाईल वापराबाबत सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

रेवदंडा : महेंद्र खैरे

रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेरोंडा येथे एका अल्पवयीन मुलाने इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे अल्पवयीन मुलांच्या मोबाईल वापराचा तसेच सोशल मीडियावरील संभाव्य धोक्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९४, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ चे कलम १४ व १५, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(बी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नानकुल यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. कांबळे करीत आहेत.

पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेवदंडा पोलिसांनी पालक आणि शिक्षकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात मोबाईल देताना त्यांचा इंटरनेट व सोशल मीडियावरील वापर कसा आहे, याकडे पालकांनी लक्ष द्यावे. इंटरनेटच्या माध्यमातून होणारे सायबर फसवणुकीचे प्रकार, अश्लील सामग्रीचा संपर्क आणि त्यातून निर्माण होणारे संभाव्य धोके याबाबत मुलांना योग्य मार्गदर्शन करावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करावे आणि आवश्यकतेनुसार त्यांचे समुपदेशन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करताना योग्य-अयोग्य याची जाणीव मुलांमध्ये निर्माण करणे, तसेच पालक आणि शिक्षकांनी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. डिजिटल माध्यमांचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे, असे रेवदंडा पोलिसांनी आवाहन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *