ताज्याघडामोडी

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पगारदार खातेदारांसाठी मोठा निर्णय शिक्षकांना मिळणार ५० लाखांचे विमा कवच; रमजाननिमित्त बिनव्याजी ॲडव्हान्स सुविधा

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पगारदार खातेदारांसाठी मोठा निर्णय

शिक्षकांना मिळणार ५० लाखांचे विमा कवच; रमजाननिमित्त बिनव्याजी ॲडव्हान्स सुविधा

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील पगारदार खातेदारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक तसेच पगारदार खातेदारांना ५० लाखांपर्यंतचे विमा कवच उपलब्ध करून देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षक व पगारदार खातेदारांना आर्थिक सुरक्षिततेचा मजबूत आधार मिळणार आहे.

यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी माहिती देताना सांगितले की ५० लाखांच्या विमा कवचामुळे खातेदारांच्या कुटुंबाला मोठा वैद्यकीय आर्थिक आधार मिळणार आहे. आकस्मिक मृत्यू किंवा अनपेक्षित परिस्थितीत कुटुंबाच्या हातात तात्काळ मोठी आर्थिक मदत उपलब्ध होणार असल्याने त्यांच्या कुटुंबाचे शिक्षण, दैनंदिन खर्च तसेच कर्जाची परतफेड यांसारख्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे सोपे होईल. विशेषतः शिक्षक तथा पगारदार कुटुंबांच्या भविष्यासाठी हे कवच मोठे संरक्षण ठरणार असून कुटुंबाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी हा निधी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. बँकेच्या स्थापनेपासून या खातेदारांचा बँकेच्या वाटचालीत मोठा वाटा असून काळाप्रमाणे त्यांना अधिक सुरक्षा कवच देणे बँकेची सामाजिक जबाबदारी आहे या दृष्टीकोनातून बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील आणि संचालक मंडळ यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.

याशिवाय रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर पगारदार खातेदारांना बिनव्याजी ॲडव्हान्स रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय बँकेने सलग तिसर्‍या वर्षी सुद्धा घेतला आहे. गणेशोत्सव, दिवाळी ,रमजान ईद या सणासुदीच्या काळात किंवा तातडीच्या गरजेच्या वेळी आर्थिक अडचण निर्माण झाल्यास खातेदारांना या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळत असतो,त्यामुळे ही सुविधा बँकेच्या वतीने यावर्षी सुद्धा दिली जाणार आहे. अशा वेळी खातेदारांना आर्थिक अडचण येऊ नये म्हणून बँकेच्या माध्यमातून ही मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *