सायबर फसवणुकीसाठी ‘म्युल’ बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
सायबर फसवणुकीसाठी ‘म्युल’ बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
रेवदंडा | प्रतिनिधी
सायबर फसवणुकीत वापरण्यासाठी स्वतःचे बँक खाते कमिशनच्या मोबदल्यात इतरांना उपलब्ध करून दिल्याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रेवदंडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सायबर तक्रारीच्या तपासादरम्यान करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस शिपाई जीवनकुमार शिवाजी मोहिते (रेवदंडा पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते ३० जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मौजे मठवाडी आदिवासीवाडी, पो. बेलोशी, ता. अलिबाग येथे हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणातील आरोपी म्हणून सरिता रमेश नाईक (वय ३५, रा. मठवाडी आदिवासीवाडी, पो. बेलोशी, ता. अलिबाग) आणि संदीप (पूर्ण नाव व पत्ता अद्याप निष्पन्न नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर फसवणुकीतून प्राप्त झालेली रक्कम संबंधित बँक खात्यात जमा झाल्यानंतर ती विविध माध्यमांतून काढून किंवा इतर खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली. तपासात संबंधित बँक खाते हे सायबर गुन्ह्यात ‘म्युल अकाऊंट’ म्हणून वापरले गेल्याचे समोर आले आहे. आरोपींनी कमिशनच्या मोबदल्यात स्वतःचे बँक खाते इतरांना वापरण्यास दिल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०९/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१७(५), ६१(२), ४९ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक/तपास अधिकारी करीत आहेत.
