ताज्याघडामोडी

महागाईच्या विळख्यात तरुणाई; सरकारला लाडक्या भावांची आठवण कधी होणार?

महागाईच्या विळख्यात तरुणाई; सरकारला लाडक्या भावांची आठवण कधी होणार?
-विक्रांत नंदकुमार वार्डे
अध्यक्ष,शेकाप पुरोगामी युवक संघटना,अलिबाग तालुका

रेवदंडा | प्रतिनिधी
सध्या देशात पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. या वाढत्या महागाईचा सर्वात मोठा फटका जर कुणाला बसत असेल, तर तो सामान्य तरुणांना. रोज नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या युवकाचा महिन्याचा खर्च प्रचंड वाढला आहे. काही वर्षांपूर्वी जेवढ्या पैशात महिनाभराचा इंधन खर्च भागायचा, तेवढे पैसे आता काही दिवसांतच संपतात.

आज अनेक तरुण खाजगी कंपन्यांमध्ये काम करतात. त्यांना रोज २०, ३० किंवा ५० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. पगार मात्र तेवढाच आणि खर्च दिवसेंदिवस वाढतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे नोकरी टिकवणंही काही जणांसाठी कठीण होत चाललं आहे. काम करा, प्रवास करा आणि महिनाअखेरीस हातात काहीच उरू नये, अशी अवस्था अनेकांची झाली आहे.

व्यवसाय करणाऱ्या तरुणांची परिस्थितीही काही वेगळी नाही. मालवाहतूक महाग झाली, वाहनांचा खर्च वाढला, ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाली. परिणामी छोट्या व्यावसायिकांच्या नफ्यावर थेट गदा आली आहे. अनेक तरुणांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केले, पण वाढत्या खर्चामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे.
पर्यटन क्षेत्राशी संबंधित हॉटेल, रेस्टॉरंट, होमस्टे आणि खाद्य व्यवसाय करणाऱ्या तरुणांची व्यथा तर अधिक गंभीर आहे. गॅस सिलिंडरचे वाढते दर, भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किमती, वीजबिले, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च यामुळे व्यवसाय चालवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. ग्राहकांना जास्त दर लावले तर ते नाराज होतात, आणि दर वाढवले नाहीत तर नफा राहत नाही. अनेक तरुणांनी शिक्षण पूर्ण करून किंवा कर्ज काढून हॉटेल व्यवसाय उभा केला आहे. पण आज त्यांच्यासमोर व्यवसाय टिकवण्याचंच मोठं आव्हान उभं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *