वावे येथे नवीन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण उत्साहात

संतोष निगडे यांच्या प्रयत्नांतून जिल्हा नियोजन निधीतून उभारणी
रेवदंडा | प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील वावे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि. १४ जुलै) उत्साहात संपन्न झाला. अलिबाग पंचायत समितीच्या बेलोशी गणाचे सदस्य तथा शिवसेना ज्येष्ठ नेते संतोष निगडे यांच्या पाठपुराव्यामुळे ही अंगणवाडी इमारत जिल्हा नियोजन निधीतून साकारण्यात आली आहे.
वावे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संतोष निगडे उपस्थित होते. प्रारंभी ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते पूजाअर्चा करण्यात आली. जनार्दन तुरे, दिनेश राऊत, हरिश्चंद्र गावंड, देविदास राऊत आणि संतोष निगडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर संतोष निगडे व जनार्दन तुरे यांच्या हस्ते फीत कापून नवीन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
यानंतर अंगणवाडी परिसरात स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. वावे ग्रामस्थांच्या वतीने संतोष निगडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी दिनेश राऊत व जनार्दन तुरे यांनी मनोगत व्यक्त करताना संतोष निगडे यांनी वावे गावातील अनेक विकासकामे मार्गी लावली असून, त्यांच्या प्रयत्नांतून अंगणवाडीची नवीन इमारत साकार झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
प्रमुख अतिथी संतोष निगडे यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानत, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. नवीन अंगणवाडीमुळे गावातील बालकांना सुरक्षित, सुसज्ज व दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास दिनेश राऊत, जनार्दन तुरे, हरिश्चंद्र गावंड, शिरीष तुरे, नितीन गावंड, जयवंत गावंड, विलास गावंड, मंदार मिसाळ, देविदास राऊत, सुनाथ पाटील, अंकित गावंड, अनिल गावंड, विशाला आरकशी, राजेंद्र फुंडे, महादेव तुरे, शीता गायकर, वसंत गायकर, मनीषा मिसाळ, गंगू फुंडे, कमळी पाटील यांच्यासह ग्रामस्थ, महिला व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
