महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सहकारी बँकेचा रायगड जिल्हा बँकेला बहुमान
महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सहकारी बँकेचा रायगड जिल्हा बँकेला बहुमान
कॅबिनेट मंत्री संजय सावकारे, आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते सन्मान
रेवदंडा – महेंद्र खैरे :
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक प्रगतीची, आर्थिक शिस्तीची आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत बँकेला ‘महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. मंत्रालयाच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित समारंभात राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय सावकारे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीणजी दरेकर आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील, यांच्या हस्ते बँकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी बँकेचे संचालक परेश देशमुख, संतोष पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, कर्ज विभागाचे चीफ मॅनेजर संजीव देशमुख तसेच अन्य अधिकारी यांनी हा पुरस्कार बँकेच्या वतीने स्वीकारला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे अभिनंदन करताना त्यामध्ये अधिक तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले तसेच जिल्हा सहकारी बँक, सहकारी पतसंस्था यामधील कामकाज कसे सुरू आहे याबाबत शहरातील नागरिकांनी देखील सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. तसेच महाराष्ट्राच्या सहकाराची ताकद ही कोणत्याही एका राजकीय सत्तेची वा व्यक्तीची ताकद नाही; ती राज्यातील हजारो सहकारी संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांची ताकद आहे. सहकार जपणाऱ्या, वाढवणाऱ्या आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक सहकारी संस्थेचे मी मनापासून कौतुक करतो असेही त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
रायगड जिल्हा बँकेला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे कोकणातील सहकार चळवळीला मिळालेली गौरवाची पावती आहे. बँकेच्या नेतृत्वाखाली सहकाराचे जाळे अधिक मजबूत होत असून, सहकारी पतसंस्था आणि बँकांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. बचत गटांच्या माध्यमातून पर्यटन आणि लघुउद्योगांना नवी दिशा मिळत असून, बँकेच्या आर्थिक सहकार्यामुळे स्थानिक महिला आणि नागरिकांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होत आहेत.















