ताज्याघडामोडी

मोबाईलच्या हट्टापायी १५ वर्षीय मुलगी घरातच कपाटात लपली!

मोबाईलच्या हट्टापायी १५ वर्षीय मुलगी घरातच कपाटात लपली!

अपहरणाचा बनाव उघड; रेवदंडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलगी सुखरूप

मोबाईल मिळत नसल्याच्या रागातून मुलीचे नाट्य; पालकांसह पोलिसांची उडाली धावपळ, अनावश्यक शासकीय मनुष्यबळ खर्ची

रेवदंडा – महेंद्र खैरे : मोबाईलचा वाढता वापर आणि त्यासाठी लहान मुलांकडून केला जाणारा हट्ट ही पालकांसाठी चिंतेची बाब बनत आहे. याचाच प्रत्यय मुरुड तालुक्यातील बोर्ली येथे नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आला. मोबाईल घेऊन देण्यास आई-वडिलांनी नकार दिल्याच्या रागातून १५ वर्षे ११ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीने घरातून पळून गेल्याचा नव्हे, तर आपले अपहरण झाल्याचा बनाव केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. विशेष म्हणजे, ही मुलगी घरातील कपाटात कपड्यांच्या आडोशाला लपून बसली होती. रेवदंडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती सुखरूप मिळून आल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास बोर्ली येथील मुलीचे आई-वडील मुरुड येथील शंकर मंदिरात गेले होते. त्यावेळी त्यांनी मुलीला घरी एकटे ठेवले होते. दरम्यान, मोबाईल खरेदी करून देण्याचा हट्ट आई-वडिलांकडे धरला होता. मात्र, पालकांनी मोबाईल घेण्यास नकार दिल्याने मुलीच्या मनात राग होता. याच रागातून तिने घरातील कपाटाच्या खणात कपड्यांच्या आडोशाला जाऊन लपून बसत घरातून बेपत्ता झाल्याचा बनाव केला.

सायंकाळी आई-वडील घरी परतल्यानंतर मुलगी घरात दिसून न आल्याने कुटुंबीयांमध्ये एकच घबराट पसरली. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली. नातेवाईकांनी तातडीने रेवदंडा पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

दरम्यान, पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता घरातील अडगळीत असलेल्या जागा तसेच कपाटांची सखोल तपासणी झाली नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रेवदंडा पोलिसांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी धाव घेत घराची तपासणी केली. यावेळी संबंधित अल्पवयीन मुलगी घरातील कपाटात कपड्यांच्या आडोशाला लपून बसलेली आढळून आली. त्यामुळे तिच्या अपहरणाचा संशय दूर झाला आणि ती सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेमुळे मोबाईलच्या हट्टापायी एका कुटुंबाला मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागले, तर पोलिसांनाही अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासासाठी आवश्यक ती यंत्रणा कामाला लावावी लागली. अशा घटनांमुळे पोलिसांचे मौल्यवान मनुष्यबळ, शासकीय वेळ आणि तपास यंत्रणेची साधने खर्ची पडतात. गुन्ह्याची नोंद, तपासातील कागदपत्रांची पूर्तता आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठीही अतिरिक्त वेळ द्यावा लागतो.

पालकांनो, मुलांच्या मोबाईल वापराकडे लक्ष द्या!

आजच्या डिजिटल युगात मोबाईल शिक्षण, माहिती आणि संवादाचे प्रभावी साधन असले, तरी त्याचा अतिरेक लहान मुलांच्या वर्तनावर परिणाम करू शकतो. मोबाईल मिळाला नाही म्हणून चिडचिड करणे, रागावणे, जेवण न करणे किंवा टोकाची भूमिका घेणे, ही लक्षणे पालकांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मुलांना मोबाईल वापराचे योग्य नियम समजावून सांगणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि मैदानी खेळ, वाचन तसेच इतर छंदांकडे त्यांना वळवणे आवश्यक आहे.

बोर्ली येथील या घटनेने पालकांसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. मुलांचा मोबाईलचा हट्ट केवळ किरकोळ समजून दुर्लक्ष न करता, त्यांच्या मानसिकतेचा विचार करून वेळीच योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. एका छोट्याशा हट्टामुळे कुटुंबासह पोलीस यंत्रणेलाही मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *