ताज्याघडामोडी

निष्ठावंत भाजप कार्यकर्ता, जनसेवेचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व – उदय काठे

निष्ठावंत भाजप कार्यकर्ता, जनसेवेचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व – उदय काठे

सामाजिक कार्याचा वारसा जपत राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व; वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
रेवदंडा – महेंद्र खैरे
सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत, सामाजिक बांधिलकी जपत आणि भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहून गेली अनेक वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उदय काठे यांचा २३ नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, नातेवाईक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नागाव येथे जन्मलेल्या उदय काठे यांचे बालपण आणि शिक्षण नागाव परिसरात झाले. शालेय जीवनापासूनच राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रभाव त्यांच्या मनावर होता. देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात लहानपणापासूनच दिसून येत होती. मुंबई येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत असताना १९८९ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत ते भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत.

१९९५ मध्ये भाजप नागाव विभागाच्या सरचिटणीसपदापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास पुढे युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस, रायगड जिल्हा चिटणीस, तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा पातळीवरील विविध जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला. पक्षाने सोपविलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. राजकीय प्रवासात अनेक निवडणुकांचे यश-अपयश अनुभवले; मात्र कोणत्याही परिस्थितीत पक्षनिष्ठा आणि जनसेवेचा वसा त्यांनी सोडला नाही.

राजकारणासोबतच समाजकारणाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या पत्नी सरिता काठे काठे यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले, तर स्वतः उदय काठे यांनीही पंचायत समितीची निवडणूक लढवून जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रिय भूमिका बजावली. वीज, पाणी, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी त्यांनी अनेक आंदोलने आणि पाठपुरावा केला. विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले. स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून रस्ते, शाळा आणि पायाभूत सुविधांची अनेक कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

१९९२ च्या रामजन्मभूमी आंदोलनातील सहभाग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांबद्दल असलेला आदर आणि राष्ट्र प्रथम ही भावना त्यांच्या विचारविश्वाचा महत्त्वाचा भाग आहे. ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ या विचारधारेवर विश्वास ठेवून त्यांनी आजवर आपली वाटचाल केली आहे.

राजकीय आणि सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी स्वतःचा व्यावसायिक प्रवासही प्रामाणिकपणे जपला. १९९५ ते २०१० या काळात सुमारे १५ वर्षे विक्री व विपणन क्षेत्रात काम केल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून नागाव येथे टेलरिंग युनिटचा व्यवसाय ते सांभाळत आहेत. व्यवसाय, कुटुंब आणि सामाजिक कार्य यांचा समतोल राखत ते आजही जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. सर्वसामान्य नागरिकांच्या कोणत्याही अडचणीच्या वेळी २४ तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता, हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.1995 ते 2010 पर्यंत रेवदंडा – अलिबाग -चणेरा विक्रम मिनिडोर संघटनेत सक्रिय चालक, मालक म्हणून व्यवसाय केला आणि त्याचा अभिमान आहे

‘राजकारण कमी आणि समाजकारण जास्त’ या भूमिकेतून काम करणारे उदय काठे हे पदापेक्षा कार्याला, प्रसिद्धीपेक्षा जनसेवेला आणि राजकीय स्वार्थापेक्षा सामाजिक बांधिलकीला महत्त्व देणारे व्यक्तिमत्त्व आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांची सुरू असलेली वाटचाल अशीच अखंड सुरू राहो, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक कार्यासाठी नवी ऊर्जा लाभो, हीच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *