ताज्याघडामोडी

गेल, उसर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३० रक्तदात्यांचे उत्स्फूर्त योगदान

गेल, उसर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३० रक्तदात्यांचे उत्स्फूर्त योगदान
रेवदंडा – महेंद्र खैरे : गेल (इंडिया) लिमिटेड, उसर आणि जिल्हा शासकीय रक्तपेढी, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने गेल कंपनीमध्ये कार्यरत गेल, ईआयएल तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी ऐच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ३० युनिट रक्त संकलित करण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन गेलचे कार्यकारी संचालक (पीडीएच-पीपी प्रकल्प) तथा प्रभारी अधिकारी अनुप गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. कर्मचाऱ्यांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, या उद्देशाने अनुप गुप्ता यांनी स्वतः सर्वप्रथम रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली.
या उपक्रमात गेल, उसर, ईआयएल तसेच विविध कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. त्यांच्या योगदानामुळे एकूण ३० युनिट रक्त संकलित झाले.
स्वेच्छा रक्तदान क्षेत्रातील या मोलाच्या योगदानाबद्दल तसेच शिबिराचे उत्तम आयोजन आणि व्यवस्थापन केल्याबद्दल जिल्हा शासकीय रक्तपेढी, अलिबाग यांच्या वतीने रक्तदाते कर्मचारी आणि गेल, उसर प्रशासनाचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गेल, उसरच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याबरोबरच रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *