ताज्याघडामोडी

अलिबागच्या वैभवी वारगेची इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील शैक्षणिक भेटीसाठी निवड!

अलिबागच्या वैभवी वारगेची इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील शैक्षणिक भेटीसाठी निवड!
National Science Kalam STREAM 2026 उपक्रमात उल्लेखनीय सहभाग; रॉकेट प्रक्षेपण केंद्र प्रत्यक्ष पाहण्याची मिळणार संधी
रेवदंडा – महेंद्र खैरे : अलिबाग येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल आणि रिअल अकॅडमीची इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी कु. वैभवी अशोक वारगे हिने आपल्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील National Science Kalam STREAM 2026 या उपक्रमात सहभाग घेतल्यानंतर तिची आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत असलेल्या सतीश धवन अंतराळ केंद्राला (SDSC-SHAR) शैक्षणिक भेट देण्यासाठी निवड झाली आहे.
दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या या शैक्षणिक भेटीदरम्यान वैभवीला भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तसेच रॉकेट प्रक्षेपण केंद्र, लॉन्च पॅड आणि अंतराळ मोहिमांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रक्रियांची माहिती जाणून घेता येणार आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विज्ञानविषयक विचारांपासून प्रेरणा घेतलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि अंतराळ विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करणे हा आहे.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र हे भारताच्या अंतराळ संशोधन आणि रॉकेट प्रक्षेपण मोहिमांचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. अशा महत्त्वपूर्ण केंद्राला भेट देण्याची संधी मिळणे ही वैभवीसाठी निश्चितच अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे.
वैभवीच्या या निवडीमुळे अलिबागच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या या यशाबद्दल वडील श्री. अशोक धर्मा वारगे, कुटुंबीय, शिक्षकवृंद आणि मित्रपरिवाराकडून तिचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अलिबागच्या वैभवीची इस्रोच्या अंतराळविश्वाकडे भरारी; तिच्या यशाने रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *