ताज्याघडामोडी

चौलनाका येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० रक्तदात्यांचे रक्तदान

चौलनाका येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० रक्तदात्यांचे रक्तदान

जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ यांचे रक्तदान; संदेश बेडेकर यांचे १०२व्यांदा रक्तदान

रेवदंडा – महेंद्र खैरे : अलिबाग येथील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये, या सामाजिक भावनेतून चौलनाका येथे तातडीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल ५० रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

डॉ. केदार ओक यांच्या सहकार्याने सुंदर नारायण मंदिर, चौल येथे फाफे बंधू स्वीट मार्टसमोर रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १.३० या वेळेत हे शिबिर पार पडले. शासकीय रक्तपेढी अलिबाग येथील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तपेढीच्या मागणीनुसार या उपक्रमाचे तातडीने आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. तर संदेश बेडेकर यांनी तब्बल १०२व्यांदा रक्तदान करण्याचा उल्लेखनीय विक्रम कायम राखला. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

या रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी जितेश नागवेकर, संदेश बेडेकर, योगेश चेरकर आणि सुदर्शन वैद्य यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच डॉ. दीपक गोसावी, डॉ. बहिर्जी नाईक, गणेश भोये, सुशांत भगत, प्रतीक महाले आणि उमेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

रक्तदान हे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होते. याच मानवतावादी भावनेतून ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला. अलिबाग शासकीय रक्तपेढीतील रक्ताची गरज लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *