ताज्याघडामोडी

थेरोंडा खंडेरावपाडा ते वर्षा हॉटेल रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण

थेरोंडा खंडेरावपाडा ते वर्षा हॉटेल रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण

जि.प. सदस्य डॉ. सचिन राऊळ यांच्या स्वखर्चातून ५०० मीटर रस्त्याचे नूतनीकरण

रेवदंडा – महेंद्र खैरे : थेरोंडा येथील खंडेरावपाडा ते वर्षा हॉटेलदरम्यानच्या अंतर्गत रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून ये-जा करताना ग्रामस्थांसह वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. ग्रामस्थांची ही गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ यांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता सामाजिक बांधिलकीतून स्वखर्चाने सुमारे ५०० मीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण केले आहे.

थेरोंडा ग्रामस्थांनी सदर रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी डॉ. सचिन राऊळ यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांची मागणी आणि रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पुढाकार घेत स्वखर्चाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा निर्णय घेतला. या कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला होता. आता रस्त्याचे काँक्रीटीकरण व नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून हा रस्ता ग्रामस्थ आणि वाहनचालकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.

या कामामुळे थेरोंडा खंडेरावपाडा परिसरातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाली असून दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होणार आहे. शासकीय निधीची प्रतीक्षा न करता स्वतःच्या खर्चातून रस्त्याचे काम पूर्ण केल्याबद्दल थेरोंडा ग्रामस्थांच्या वतीने डॉ. सचिन राऊळ यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

यावेळी गोरखनाथ नवरीकर, संतोष कोंडे, महेश जंगली, मनोज जंगली, जयहिंद जंगली, रामदास पोसणे, दिनेश सुडकू, भालचंद्र सारंग, धनंजय सुडकू, अनिल कालेकर, काबाळे, वर्गे यांच्यासह खंडेरावपाडा व थेरोंडा येथील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *