ताज्याघडामोडी

पेझारीचे सुपुत्र अमोल पाटील यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’

पेझारीचे सुपुत्र अमोल पाटील यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’
रेवदंडा : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पेझारी गावचे सुपुत्र श्री. अमोल आत्माराम पाटील (बुवा) यांच्या गेल्या ३५ वर्षांपासून भजन क्षेत्रासह ऑर्केस्ट्रा व महफिल क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची तसेच समाजसेवेतील कार्याची दखल घेत बी. द चेंज फाउंडेशन, शिर्डी यांच्या वतीने त्यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
बी. द चेंज फाउंडेशनच्या वतीने रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी शिर्डी येथील साई पालखी निवारा, साईबाबा मंदिर परिसर येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. श्री. किशोर रामचंद्र निर्मळ, संस्थापक-संचालक, प्रभात डेअरी लिमिटेड व किसान कनेक्ट शेफ फूड प्रायव्हेट लिमिटेड, मा. श्री. डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे, चेअरमन, अश्वमेघ ग्रुप ऑफ कंपनीज, मा. श्री. बाळकृष्ण एखडे, उद्योजक/चार्टर्ड अकाउंटंट, मा. श्री. तेजस्वी यमाजी मोटे, मंडळ कृषी अधिकारी, कोपरगाव कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, मा. श्री. सर्जेराव मुंढे, चेअरमन, सद्गुरू ग्रुप, मा. श्री. बाबासाहेब कापे, संचालक, विश्वरूप इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, मा. श्री. विशाल थोरात, उद्योजक, पुणे, मा. निवेदिता पगार, अभिनेत्री/मॉडेल आणि मा. श्री. अरुण भंडारे, कार्याध्यक्ष, विविध सैनिक संघ नाशिक, महाराष्ट्र राज्य आदी मान्यवर उपस्थित होते.
अमोल पाटील (बुवा) यांनी गेली ३५ वर्षे भजन क्षेत्रात सातत्याने योगदान देत ऑर्केस्ट्रा व महफिलीच्या माध्यमातूनही आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे. तसेच सामाजिक कार्यातही त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या या दीर्घकाळाच्या कार्याची दखल घेत मिळालेल्या या पुरस्कारामुळे पेझारी गावासह अलिबाग तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
अमोल पाटील यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल पेझारी, अलिबाग व रायगड परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *