ताज्याघडामोडी

राजकीय चक्रव्यूह रचणाऱ्यांनो, मी अभिमन्यू नाही; चक्रव्यूह भेदून बाहेर पडणारा योद्धा! – सुनील तटकरे

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 42;
राजकीय चक्रव्यूह रचणाऱ्यांनो, मी अभिमन्यू नाही; चक्रव्यूह भेदून बाहेर पडणारा योद्धा! – सुनील तटकरे
महायुतीच्या आमदारांविरोधात काम केल्याचा एक तरी पुरावा द्या, कितीही टीका झाली तरी रायगडच्या विकासाचा ध्यास सोडणार नाही; विरोधकांची टीका मी एन्जॉय करतो – तटकरे यांचा सूचक इशारा

रेवदंडा – राजकारणात माझ्याविरोधात कितीही चक्रव्यूह रचले, कितीही राजकीय कटकारस्थाने केली तरी त्यातून मार्ग काढण्याची ताकद माझ्यात आहे. महाभारतात अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवण्यात आले होते; मात्र मी असा अभिमन्यू आहे, जो आतापर्यंतचे सर्व राजकीय चक्रव्यूह भेदून इथपर्यंत पोहोचलो आहे! त्यामुळे विरोधकांनी कितीही डावपेच आखले किंवा माझ्यावर कितीही तिखट टीका केली तरी मी विचलित होणार नाही. उलट ही टीका मी एन्जॉय करतो. माझा ध्यास राजकीय कुरघोड्यांचा नसून रायगडच्या विकासाचा आहे, अशा आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी विरोधकांना सुनावले.

अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे गटाच्या आमदारांकडून आणि पालकमंत्र्यांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेचा समाचार घेताना तटकरे यांनी आपल्या चार दशकांच्या राजकीय प्रवासातील अनेक घटनांचा दाखला दिला. २००२ मधील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या राजकारणापासून ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतचा घटनाक्रम उलगडत त्यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे, महायुतीतील आमदारांच्या विरोधात काम केल्याचा एक तरी पुरावा द्या, असे खुले आव्हान देत त्यांनी विरोधकांच्या आरोपांनाच प्रतिप्रश्न केला.

२००२ मधील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देताना तटकरे यांनी पक्षाच्या निर्णयानुसार वागण्याचा आपला प्रयत्न कायम राहिल्याचे सांगितले. त्या काळात पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा, शेतकरी कामगार पक्षाला मदत करण्याबाबत आलेला निरोप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची राजकीय परिस्थिती अशा अनेक घडामोडी घडल्या होत्या. रात्री दोन वाजेपर्यंत आपण या प्रक्रियेत सहभागी होतो. पक्षाने दिलेली जबाबदारी आणि निर्णय पाळण्याची आपली भूमिका होती. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्येही आपण पक्षहिताला प्राधान्य दिले, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या विषयाला पूर्णविराम दिल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडूनही हा निर्णय घेण्याचा विषय संपला आहे, अशा स्पष्ट शब्दांत तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. या विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांनी आपल्याला सहकार्य केले, याची जाणीव असल्याचे सांगत त्यांनी महाड, पनवेल आणि खेडमधील मतदानाच्या आकडेवारीचे संदर्भ दिले. काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना मिळालेले मताधिक्य आणि आपल्याला मिळालेली मते यांचा उल्लेख करत महायुतीच्या आमदारांच्या विरोधात आपण काम केल्याचा एक तरी ठोस पुरावा द्यावा, असे आव्हान त्यांनी दिले. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविणे आणि विकासकामांसाठी पाठपुरावा करणे हेच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची अधिसूचना आल्यानंतर आपण त्यांचे अभिनंदन करून स्वागत केले होते. जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशी भूमिका माध्यमांसमोर मांडली होती. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत असताना जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची हीच वेळ आहे. एकत्रितपणे विकास करण्यात आपण अपयशी ठरलो तर काळही आपल्याला माफ करणार नाही, असे तटकरे म्हणाले.

अलिबागमधील मेडिकल कॉलेजचा सुमारे 700 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, एमबीबीएस शिक्षणासाठी आरसीएफच्या माध्यमातून करावी लागणारी व्यवस्था आणि प्रकल्पाच्या कामातील अडचणी याकडे त्यांनी लक्ष वेधले. मेडिकल कॉलेज उभाराला उशीर झाला का लागत आहे याचाही विचार झाला पाहिजे असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे टीकेचा रोख स्थानिक आमदार महेंद्र दळवींकडे वळवला. त्याचबरोबर भूसंपादन करताना शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्यानुसार योग्य मोबदला मिळाला पाहिजे. अलिबागमधील जमिनीच्या मूल्यांकनानुसार शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जत परिसरातील टोरंटचा ऊर्जा प्रकल्प, टाटाचा भिवपुरी जलविद्युत प्रकल्प, माणगाव तालुक्यातील पंप स्टोरेज प्रकल्प आणि महाड परिसरातील प्रस्तावित प्रकल्पांचा संदर्भ देत त्यांनी भूमिका मांडली. सह्याद्रीचा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि पर्यावरणीय परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे. माणगावमधील प्रकल्प एनटीपीसी या केंद्र सरकारच्या कंपनीकडून राबविला जात असून, ग्रामस्थांच्या भावना आणि त्यांच्या शंकांचे निरसन करूनच पुढील निर्णय व्हावेत. विजेची गरज आणि उपलब्ध जलस्रोत लक्षात घेता प्रकल्पांचा सकारात्मक विचार करण्याचीही आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

अलिबाग-रोहा रस्त्याची दुरावस्था, पुलांची कामे आणि वाहतुकीच्या अडचणी लक्षात घेता या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांबाबत आदेश काढल्यानंतरही वाहतूक सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार यांच्याबद्दल आपल्याला कमालीचा आदर होता आणि तो कायम राहील, असे सांगताना तटकरे यांनी बारामती दौऱ्याचा उल्लेख केला. दिवाळीच्या काळात बारामतीला जाऊन अपघातस्थळी अभिवादन केले तसेच अजित पवार यांच्या मातोश्री आणि भगिनींची भेट घेतली. त्यांच्या स्मृतीप्रती असलेली भावना व्यक्त करण्यासाठीच आपण बारामतीला गेलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय जीवनात अनेक चढ-उतार अनुभवले असून रायगडमध्ये अनेक वर्षे संघर्ष केला आहे. मात्र टीका करताना भाषेचा आणि वैचारिक स्तराचा तोल कधीही ढळू दिला नाही. राजकीय आव्हाने ही जीवनाचा भाग आहेत. आपली नियत आणि नीती योग्य असेल तर कोणत्याही चक्रव्यूहातून बाहेर पडता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे; मात्र आपण आपल्या पद्धतीने विकासाचे काम करत राहणार आहोत. रायगडच्या जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरणे हेच आपले ध्येय असल्याचे सांगत तटकरे यांनी पत्रकार परिषदेतून विरोधकांना संयमी पण ठोस संदेश दिला.

याप्रसंगी हर्षल पाटील, चारहास मगर, रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित नाईक, तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *