चोरढे येथे १४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
चोरढे येथे १४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
सोमजाई माता क्रीडा मंडळाचा स्तुत्य उपक्रम; चंद्रकांत खोत यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन
रेवदंडा | प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील चोरढे येथे सोमजाई माता क्रीडा मंडळ, खरसई यांच्या वतीने संस्थापक तथा कामगार भूषण चंद्रकांत खोत यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत दोन शाळांमधील एकूण १४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
शुक्रवारी (दि. १० जुलै) सकाळी आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत खोत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी विद्यालय, चोरढेचे अध्यक्ष काशिनाथ तांबडे, राजिप शाळेचे अध्यक्ष काशिनाथ पैर, खजिनदार पांडुरंग कांबळी, ग्रामसचिव राम मंदारे, माजी अध्यक्ष नरेश भातळकर, कार्यकर्ते हिराजी पाटील, क्रीडा प्रमुख लक्ष्मण पाटील, समाजसेवक यशवंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल चोरढेकर, काशिनाथ कोकाटे, माजी विद्यार्थी दीपेश चोरढेकर, शंकर चोरढेकर, राजिप शाळेच्या मुख्याध्यापिका भगत मॅडम, महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भिडे मॅडम, उपाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील, खजिनदार राम भोपी, महेश डोलकर, आंबलीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात राजिप शाळा, चोरढे येथे इयत्ता पहिली ते सातवीमधील ७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका भगत मॅडम व शिक्षकवृंद यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
त्यानंतर दिनाभाई मोरे संचलित महात्मा गांधी विद्यालय, चोरढे येथे झालेल्या कार्यक्रमात इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या ७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यालयाचे अध्यक्ष काशिनाथ तांबडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे चंद्रकांत खोत व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रकांत खोत यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच आमदार महेंद्र दळवी यांच्या विकासकामांचे कौतुक करत त्यांचा कार्यसम्राट आमदार म्हणून गौरव केला.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य तथा महात्मा गांधी विद्यालयाचे संचालक अनिल चोरढेकर यांनी केले. उपस्थितांनी सोमजाई माता क्रीडा मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निश्चितच प्रोत्साहन मिळत असल्याची भावना व्यक्त केली.
