ताज्याघडामोडी

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६५ वी वार्षिक सभा उत्साहात १० हजार कोटी व्यवसायाचे लक्ष्य;

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६५ वी वार्षिक सभा उत्साहात
१० हजार कोटी व्यवसायाचे लक्ष्य;

रेवदंडा | प्रतिनिधी

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ८,१७५ कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा गाठत उल्लेखनीय प्रगतीची नोंद केली असून, लवकरच १० हजार कोटी रुपयांचा व्यवसाय आणि १,००० कोटी रुपयांचा स्वनिधी गाठण्याचा संकल्प केला आहे. तसेच सभासदांना १२.५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

अलिबाग येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी बँकेचे संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक तसेच अधिकारी, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात जयंत पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आधुनिक व उत्पन्नवाढीच्या शेतीकडे प्रोत्साहित करण्यासाठी बँकेने ‘कृषीमित्र’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पडीक जमिनीवर बांबू लागवड तसेच ड्रॅगन फ्रूट प्रकल्पांसाठी केवळ ७ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. रोहा येथील प्रगतशील शेतकरी हर्षद साळवी यांनी ड्रॅगन फ्रूट शेतीत केलेल्या यशस्वी प्रयोगाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संगणकीकरण पूर्ण करणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठरली आहे. तसेच महाराष्ट्रात प्रथमच ऑनलाइन व बायोमेट्रिक पद्धतीने पीक कर्ज वितरण प्रणाली सुरू करण्यात आली असून, ७/१२ उताऱ्याची ऑनलाइन पडताळणी करून पारदर्शक आणि जलद कर्जप्रक्रिया राबविण्यात येत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील बँकेच्या कामगिरीचा आढावा सादर करताना बँकेने नेट एनपीए शून्य टक्के राखत ९३.३७ कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळविल्याची माहिती दिली. तसेच बँकेच्या व्यवसायात २७ टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगत ग्राहक, सभासद आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

सभेत कमळ नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी सहकारी पतसंस्था यांनी १,००० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी कमळ पतसंस्थेचे संस्थापक गिरीश तुळपुळे, अध्यक्ष नंदकुमार चाळके तसेच आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील आणि अध्यक्ष अभिजीत पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये रायगड जिल्ह्यातील पहिले फ्लाईंग ऑफिसर कौस्तुभ मेहूल पाटील, आदर्श शिक्षक राजेश रामचंद्र भोईर, आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू योगेश पेणकर, प्रगतशील शेतकरी मनोहर दत्तात्रेय पाटील, मंदार पाटील, हर्षद साळवी, शरीरसौष्ठवपटू प्रणव पुजारी, कृषिभूषण दिलीप भाऊ शिंदे तसेच ग्रीन अलिबाग आणि आरसीएफ एक्स एम्प्लॉयी सोशल फोरम यांचा समावेश होता. ठेववाढीत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बँकेचे संचालक संतोष पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

अहवाल वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पेझारी (अलिबाग), पाच्छापूर (पाली), कोप्रोली (पेण), वरंध (महाड), नेरळ (कर्जत) आणि गोसावीबुवा (तळा) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा गौरव करण्यात आला. तसेच ३६ वर्षे उत्कृष्ट सेवा बजावणारे अधिकारी महेंद्र माळी आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नवीन पनवेल शाखेच्या शाखाधिकारी निशा घरत यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

सभेला सभासद, अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *