नागाव बीचवर ‘रोबो रक्षक’ तैनात सरपंच हर्षदा मयेकर यांचा पुढाकार
नागाव बीचवर ‘रोबो रक्षक’ तैनात
सरपंच हर्षदा मयेकर यांचा पुढाकार
चौपाट्यांवर आता रोबोटची नजर; बुडणाऱ्यांच्या बचावासाठी हायटेक यंत्रणा सज्ज
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णायक पाऊल; सरपंचांसह ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण
रेवदंडा-महेंद्र खैरे-नागाव समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांच्या पुढाकारातून रोबोटिक वॉटर रेस्क्यू यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. बुडणाऱ्यांच्या बचावासाठी अत्याधुनिक ‘रोबो रक्षक’ आता नागाव बीचवर कार्यरत होणार असून हा निर्णय स्थानिक पातळीवर एक मोठा आणि दूरदृष्टीचा टप्पा मानला जात आहे.
कलेक्टर कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत रायगड जिल्ह्यासाठी आपत्ती विषयक विशेष कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचा सहभाग होता, तसेच नागाव, काशीद आणि श्रीवर्धन समुद्रकिनारा येथील ग्रामपंचायतींनाही निमंत्रित करण्यात आले होते. ग्रामपंचायतीपैकी फक्त नागांव ग्रामपंचायत प्रशिक्षणास हजर होते.
या प्रशिक्षणासाठी नागाव ग्रामपंचायतीकडून सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांच्यासह कर्मचारी कल्पेश नायक, मनीश म्हात्रे, आशीष मानकर आणि विनेश नागवेकर उपस्थित होते. याशिवाय विविध पोलीस स्टेशनमधील अधिकारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कलेक्टर ॲाफिस मार्फत मा.श्री.पाठक सर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.
या कार्यशाळेत पूरपरिस्थिती, नदी किंवा समुद्रात वाहून जाण्याच्या घटना, धरण परिसरातील आपत्कालीन प्रसंग तसेच सर्पदंश यांसारख्या विविध संभाव्य आपत्तींच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच फर्स्ट एड व सर्वसमावेशक आपत्कालीन किटमधील प्रत्येक घटकाचा उपयोग कसा करायचा याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. सदरील किट सर्व पोलिस स्टेशन व निवडक ग्रामपंचायतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणादरम्यान सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी महत्त्वपूर्ण मागणी मांडली. सध्या तीन समुद्रकिनाऱ्यांसाठी तीन रोबोटिक लाइफसेव्हिंग क्राफ्ट उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामध्ये नागावचा समावेश आहे. याशिवाय आणखी १५ लाइफसेव्हिंग रोबोट्सची मागणी कलेक्टर कार्यालयामार्फत करण्यात आलेली आहे.
यावेळी त्यांनी नमूद केले की, रोबोटिक यंत्रणा उपलब्ध करून देणे हे स्वागतार्ह असले तरी समुद्रकिनाऱ्यांवर कार्यरत असलेल्या पारंपरिक लाइफगार्ड्सची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. पूर्वी या लाइफगार्ड्सचे मानधन कलेक्टर कार्यालयामार्फत दिले जात होते; मात्र सध्याच्या परिस्थितीत सर्व खर्च ग्रामपंचायतींना करणे शक्य नसते. त्यामुळे किमान काही प्रमाणात—आवश्यक लाइफगार्ड्सपैकी काहींचा खर्च कलेक्टर कार्यालयाने उचलावा आणि उर्वरित खर्च ग्रामपंचायतींनी करावा—अशी मागणी त्यांनी केली.
समुद्रकिनाऱ्यावर भरतीदरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी पूर्णतः स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्ट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने सहजपणे चालवता येणारे हे यंत्र पाण्यात अडकलेल्या व्यक्तींपर्यंत वेगाने पोहोचून त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यास सक्षम आहे.
या यंत्रणेला National Disaster Response Force (NDRF) तसेच नेव्हीच्या मानकांनुसार मान्यता मिळालेली असून सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी स्वतः प्रशिक्षण पूर्ण करून ग्रामपंचायतीतील पाच कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून या यंत्रणेची कार्यक्षमता दाखवून देण्यात आली.
नागाव ग्रामपंचायतीलाही हे अत्याधुनिक क्राफ्ट उपलब्ध करून देण्यात आले असून सरपंच मयेकर यांच्या नेतृत्वाखाली नागाव किनारा सुरक्षित, सज्ज आणि तंत्रज्ञानाने सक्षम बनत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


