रायगड जिल्हा बँकेची ₹८,००० कोटींच्या व्यवसायाची विक्रमी झेप
विश्वास, सहकार आणि विकासाचा प्रवास;
रायगड जिल्हा बँकेची ₹८,००० कोटींच्या व्यवसायाची विक्रमी झेप
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकूण ₹८,००० कोटींच्या व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा गाठत सहकार क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, मागील अवघ्या चार वर्षांत बँकेच्या व्यवसायात दुपटीपेक्षाही अधिक वाढ झाली असून, ग्राहककेंद्री सेवा, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि आधुनिक बँकिंगच्या बळावर बँकेने महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले आहे.
सुमारे ६५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत रायगड जिल्हा बँकेने शेतकरी, सभासद, महिला बचतगट, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. सहकार ही केवळ आर्थिक व्यवस्था नसून समाजाच्या सर्वांगीण विकासाची चळवळ आहे, हे बँकेने आपल्या कार्यातून सातत्याने सिद्ध केले आहे.
गेल्या काही वर्षांत बँकेने डिजिटल बँकिंग, कोअर बँकिंग प्रणाली, रुपे केसीसी कार्ड, स्वयं सहाय्यता गटांचे सक्षमीकरण तसेच आधुनिक बँकिंग सुविधा प्रभावीपणे राबवल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांनाही अत्याधुनिक बँकिंग सेवांचा लाभ मिळत असून, बँकेबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
यावेळी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार जयंत पाटील यांनी राज्यातील व जिल्ह्यातील सहकारी संस्था, बँका, पतसंस्था तसेच शासकीय व निमशासकीय आस्थापनांचे आभार मानले. “₹८,००० कोटींचा व्यवसाय हा केवळ आर्थिक टप्पा नसून, ग्राहक, सभासद, शेतकरी आणि नागरिकांनी बँकेवर दाखविलेल्या विश्वासाचा सन्मान आहे,” असे त्यांनी सांगितले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ही यशस्वी वाटचाल सुयोग्य नियोजन, आर्थिक शिस्त, नियामक सूचनांचे काटेकोर पालन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि ग्राहकाभिमुख सेवेमुळे शक्य झाल्याचे सांगितले. तसेच मार्च २०२८ पूर्वी बँकेचा व्यवसाय ₹१०,००० कोटी आणि स्वनिधी ₹१,००० कोटींचा टप्पा गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सातत्याने वाढणारी नफाक्षमता, आधुनिक बँकिंगचा स्वीकार आणि समाजहिताची भूमिका याच्या बळावर सहकार क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. ₹८,००० कोटींचा व्यवसाय हा त्या यशस्वी प्रवासातील महत्त्वाचा मैलाचा दगड ठरत असून, रायगड जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला अधिक गती देणारा ठरणार आहे.
छायाचित्र: रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मुख्य कार्यालय, अलिबाग.
