ताज्याघडामोडी

रेवदंडा-चौल परिसराची प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठी वाढती पसंती

रेवदंडा-चौल परिसराची प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठी वाढती पसंती
महेंद्र खैरे, रेवदंडा
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा-चौल परिसर सध्या प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत आहे. निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि शांत वातावरण यांचा सुंदर संगम लाभलेल्या या परिसराला छायाचित्रकार आणि नवदांपत्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे.
कुंडलिका खाडी आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्याने नटलेला रेवदंडा बीच प्री-वेडिंग शूटसाठी विशेष लोकप्रिय झाला आहे. स्वच्छ, विस्तीर्ण समुद्रकिनारा, लाटांचा आवाज आणि सूर्यास्ताचे मोहक दृश्य या सर्व गोष्टींमुळे येथे दररोज अनेक फोटोशूट होताना दिसतात. यासोबतच रेवदंडा आगरकोट किल्ल्याची भव्य तटबंदी आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी छायाचित्रांना वेगळे आकर्षण देतात.
चौल परिसरातील प्राचीन मंदिरेही प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठी महत्त्वाची ठिकाणे ठरत आहेत. रामेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, शितळादेवी मंदिर परिसरातील हिरवाई, शांतता आणि पारंपरिक वास्तुकला यामुळे छायाचित्रांना एक वेगळाच भाव प्राप्त होतो. विशेषतः सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि सायंकाळच्या सौम्य प्रकाशात येथे फोटोशूटसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते.
रायगडसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून छायाचित्रकार आणि नवदांपत्ये येथे प्री-वेडिंग शूटसाठी येत आहेत. फोटोग्राफीसोबतच येथे पर्यटनाचा आनंदही घेता येत असल्यामुळे या ठिकाणाचे आकर्षण अधिकच वाढले आहे. चौलमधील बागायती परिसर, हिरवळ आणि स्वच्छ वातावरण भेट देणाऱ्यांना सुखद अनुभव देतात.
पर्यटकांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी हॉटेल्स, लॉजिंग आणि निवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच शाकाहारी व मांसाहारी भोजनाचीही उत्तम व्यवस्था आहे. विशेषतः पापलेट, सुरमई, कोळंबी यांसारख्या ताज्या समुद्री मासळीचा आस्वाद पर्यटक घेत आहेत.
प्री-वेडिंग फोटोग्राफीच्या वाढत्या ट्रेंडमुळे रेवदंडा-चौल परिसरात आर्थिक उलाढालीला चालना मिळाली असून स्थानिक व्यवसायांनाही त्याचा मोठा फायदा होत आहे. निसर्ग, इतिहास आणि पर्यटन यांचा संगम असलेला हा परिसर आगामी काळातही प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठी प्रमुख केंद्र म्हणून ओळखला जाईल, यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *