डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचे रायगड पोलिसांना मोठे सहकार्य; 615 बॅरिकेड्स व 16 ब्रेथ ॲनलायझर सुपूर्द
डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचे रायगड पोलिसांना मोठे सहकार्य;
615 बॅरिकेड्स व 16 ब्रेथ ॲनलायझर सुपूर्द
रेवदंडा | प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत मोठे योगदान दिले आहे. प्रतिष्ठानच्यावतीने तब्बल 615 बॅरिकेड्स आणि 16 ब्रेथ ॲनलायझर मशिन्स रायगड पोलिसांना सुपूर्द करण्यात आली.
अलिबाग येथील रायगड पोलीस मुख्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात प्रतिष्ठानचे विश्वस्त निरुपणकार डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी, श्री. उमेशदादा धर्माधिकारी आणि श्री. राहुलदादा धर्माधिकारी यांच्या हस्ते हे साहित्य पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे प्रदान करण्यात आले.
वाहतूक नियंत्रणास बळ
रायगड जिल्ह्यात वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक व्यवस्थापनाचे आव्हान मोठे झाले आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध करून देण्यात आलेले बॅरिकेड्स विविध ठिकाणी तैनात करून वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत होणार आहे. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी आणि अपघातप्रवण भागांमध्ये याचा प्रभावी उपयोग होणार आहे. प्रदान करण्यात आलेल्या 16 ब्रेथ ॲनलायझर मशिनमुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
…………………
प्रतिष्ठानचे सातत्यपूर्ण योगदान
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून समाजोपयोगी कार्य सातत्याने केले जाते. यापूर्वीही प्रतिष्ठानने पोलीस कल्याण निधीसाठी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. या नव्या सहकार्याबद्दल पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानले. रायगड जिल्ह्यातील वाहतूक शिस्त आणि सुरक्षिततेसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, नागरिकांनाही याचा थेट लाभ होणार आहे.


