रेवदंडा पोलिसांची दमदार कामगिरी; सीसीटीव्हीच्या मदतीने ३६ तासांत दुचाकी चोरीचा छडा; नाकाबंदी ठरली यशस्वी;ओडिशातील आरोपी गजाआड
रेवदंडा पोलिसांची दमदार कामगिरी;
सीसीटीव्हीच्या मदतीने ३६ तासांत दुचाकी चोरीचा छडा;
नाकाबंदी ठरली यशस्वी;ओडिशातील आरोपी गजाआड
रेवदंडा | प्रतिनिधी
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे खानाव (ता. अलिबाग) येथून चोरीस गेलेली दुचाकी अवघ्या ३६ तासांत शोधून काढत रेवदंडा पोलिसांनी ओडिशातील आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
खानाव येथील जितेश भास्कर पाटील (वय ३३) यांनी दि. १६ जुलै २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची TVS Ntorq 125 (क्रमांक MH-06-CS-8745) ही दुचाकी घराच्या अंगणात उभी केली होती. मात्र, दि. १७ जुलै रोजी पहाटे १.२८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली.
याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गडदे यांनी या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंगाज यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती केली.
तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये आरोपी चोरीची दुचाकी घेऊन पेण–पनवेल मार्गे जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षामार्फत पेण–पनवेल विभागातील वाहतूक पोलिसांना तात्काळ बिनतारी संदेश देण्यात आला. महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र पळस्पे यांच्या सहकार्याने नाकाबंदी करण्यात आली.
