ताज्याघडामोडी

बागमळा येथे विजेचा प्रहार; ताडाच्या झाडाला आग, मोठी दुर्घटना टळली


बागमळा येथे विजेचा प्रहार; ताडाच्या झाडाला आग, मोठी दुर्घटना टळली
रेवदंडा, ता. अलिबाग (महेंद्र खैरे) – एप्रिल महिन्यातच अवकाळी पावसाने रेवदंडा परिसरात पहाटे जोरदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
चौल येथील बागमळा परिसरात श्री शारदा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या ताडाच्या झाडावर अचानक वीज कोसळली. विजेच्या प्रहारामुळे ताडाच्या झाडाच्या शेंड्याला आग लागून झाड पेट घेतल्याची घटना घडली. पावसातही आगीच्या ज्वाला आणि ठिणग्या उसळत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
सदर ठिकाणाजवळ पेट्रोल पंप तसेच सीएनजी पंप असल्यामुळे संभाव्य मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. वेळेत परिस्थिती नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, पहाटेच्या सुमारास रेवदंडा पंचक्रोशीत ढगांचा गडगडाट व विजेच्या लखलखाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे स्थानिकांची झोप उडाली. तसेच आंबा उत्पादकांमध्ये चिंता निर्माण झाली असून काही घरांमध्ये गळतीची समस्याही निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *