शेकापक्षाच्या शुभांगी कोंडे बिनविरोध
शेकापक्षाच्या शुभांगी कोंडे बिनविरोध
रेवदंडा | महेंद्र खैरे
रेवदंडा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) उमेदवार शुभांगी रघुनाथ कोंडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. सत्ताधारी महायुतीकडून या जागेसाठी उमेदवार न दिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
रेवदंडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक १ व ६ या आरक्षित जागांवर मनिषा चुनेकर या निवडून आल्या होत्या. मात्र त्यांनी वार्ड क्रमांक १ चा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.
या पोटनिवडणुकीत शेकापच्या वतीने शुभांगी कोंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र सत्ताधारी महायुतीकडून कोणताही उमेदवार न उभा राहिल्याने कोंडे या एकमेव उमेदवार ठरल्या आणि त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
या निवडीमुळे रेवदंडा परिसरात शेकाप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून ठिकठिकाणी शुभांगी कोंडे यांचे अभिनंदन करणारे बॅनर लावण्यात आले आहेत.
दरम्यान, ही जागा महायुतीमधील भाजपच्या वाट्याला असल्याचे सांगितले जात असताना ऐनवेळी उमेदवार न देण्यामागील कारण काय, याबाबत चर्चा रंगत आहे. विरोधी महाआघाडीला ही जागा बिनविरोध देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


