रेवदंडयातील नुतन मच्छीमार्केटला शुभारंभासाठी मुहूर्त सापडेना…!

रेवदंडा | महेंद्र खैरे
रेवदंडयात नव्याने उभारण्यात आलेल्या नुतन मच्छीमार्केटचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी अद्याप हे मार्केट मच्छी विक्रेत्यांसाठी खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे “मच्छीमार्केटच्या शुभारंभासाठी मुहूर्तच सापडेना का?” अशी चर्चा सध्या रेवदंडा परिसरात रंगू लागली आहे.
रेवदंडा को.ए.सो. हायस्कूल मार्गे समुद्रकिनारी जाणाऱ्या रस्त्यावर, शेषनाथ वाडेकर स्मारकाजवळ हे नवीन मच्छीमार्केट उभारण्यात आले आहे. मच्छी विक्रेत्या महिलांसाठी बांधण्यात आलेल्या या मार्केटचे काम पूर्ण झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तसेच लाईट, पाणी आदी मूलभूत सुविधाही उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले जात असतानाही हे मार्केट अद्याप वापरासाठी खुले का करण्यात आले नाही? असा सवाल रेवदंडा-थेरोंडा परिसरातील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
नवीन मच्छीमार्केटचा शुभारंभ रखडल्याने मच्छी विक्रेत्या महिलांना आजही रेवदंडा को.ए.सो. हायस्कूलच्या गल्लीत, थेरोंडा भागात तसेच समुद्रकिनारी जाणाऱ्या मार्गावर बसून मच्छी विक्री करावी लागत आहे. मे महिन्यातील तीव्र उन्हात डोक्यावर छत्री किंवा तात्पुरता आडोसा करून कोळी महिलांना व्यवसाय करावा लागत असून ग्राहकांनाही उन्हाचा त्रास सहन करत मच्छी खरेदी करावी लागत आहे.
पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणावर मच्छी खरेदीसाठी येथे येत असतात. रेवदंडा-थेरोंडा बंदरातून होड्यांमधून आणलेली ताजी मच्छी भर उन्हात विक्रीस ठेवावी लागत असल्याने विक्रेते आणि ग्राहक दोघांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, या नुतन मच्छीमार्केटसाठी आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नांतून निधी उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, मार्केटच्या बांधकामात नियोजन आणि दूरदृष्टीचा अभाव असल्याची टीका स्थानिकांकडून केली जात आहे.
समुद्रकिनाऱ्यालगत उभारण्यात आलेल्या या मार्केटवर बसविण्यात आलेले पत्रे पावसाळ्यातील जोरदार वादळी वाऱ्यांना तोंड देऊ शकतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही ग्रामस्थांच्या मते, या ठिकाणी सिमेंट पत्र्यांचा वापर करणे अधिक योग्य ठरले असते.
यापूर्वी रेवदंडा बाजारपेठेत बांधण्यात आलेल्या जुन्या मच्छीमार्केटचा वापरही मच्छी विक्रेत्यांकडून अपेक्षित प्रमाणात होत नव्हता. पार्किंग सुविधेचा अभाव तसेच मार्केटच्या रचनेतील त्रुटींमुळे ग्राहक आणि विक्रेते दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच नव्याने हे मच्छीमार्केट उभारण्यात आले आहे. मात्र, हे नवीन मार्केट मच्छी विक्रेत्यांच्या पसंतीस उतरेल का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नुतन मच्छीमार्केटचा लवकरात लवकर शुभारंभ करून ते मच्छी विक्रेते आणि ग्राहकांसाठी खुले करण्यात यावे, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.


