रेवदंडा पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम; जुगारप्रकरणी ७, दारूबंदीसाठी ३० कारवाया
रेवदंडा पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम; जुगारप्रकरणी ७, दारूबंदीसाठी ३० कारवाया
सपोनि सुजित गडदे यांच्या नेतृत्वाखाली मटका जुगार आणि अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
रेवदंडा : रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई मोहीम हाती घेतली असून, मटका जुगार आणि अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी रेवदंडा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने कारवाईचा धडाका लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मटका जुगाराविरोधात आतापर्यंत सात कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये महेंद्र एकनाथ माहीमकर याच्याकडून ६४५ रुपयांचा मटका माल जप्त करण्यात आला. तसेच रामराज, खानाव, चौल आणि थेरोंडा परिसरात करण्यात आलेल्या कारवायांमध्ये १२ हजार ६४० रुपयांपासून ते २९ हजार ७०० रुपयांपर्यंतचा मटका माल व मोबाईल जप्त करण्यात आले. मुक्तार युसुफ पटेल आणि गजानन हरिश्चंद्र दिवकर यांच्याकडून २६ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय पत्ता जुगार खेळणाऱ्या पाच जणांविरोधातही कारवाई करून ३ हजार १०० रुपये जप्त करण्यात आले.
अवैध दारू व्यवसायाविरोधात ३० कारवाया
मटका जुगारासोबतच अवैध गावठी व विदेशी दारू विक्री आणि वाहतुकीविरोधातही पोलिसांनी मोठी मोहीम राबवली आहे. आतापर्यंत एकूण ३० कारवाया करण्यात आल्याची माहिती आहे.
या कारवाईत गावठी दारू, विदेशी दारू, दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, रबरी ट्यूब, ड्रम तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.
यामध्ये भालगाव (रोहा) येथील प्रमोद हरिश्चंद्र परडळे याच्याविरोधातील कारवाईत कारसह ८ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सूडकोली येथील दीपक परशुराम म्हात्रे याच्याकडून कारसह ३ लाख ४२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रामराज येथील शुभम सुरेश वाघमारे याच्याकडून स्कूटीसह ४० हजार ३०० रुपयांचा, तर कुदे येथील बाळू पांडुरंग वाडेकर याच्याकडून गावठी दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासह ३७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याशिवाय कोकण परिसरातील कुणाल मेघनाथ वाडकर याच्याकडून दुचाकीसह २१ हजार रुपयांचा मुद्देमाल, तर मोरंडे येथील अनंत नारायण पाचंगे याच्याकडून गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व टाकीसह १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये गावठी दारूच्या साठ्यांसह विदेशी दारूही जप्त करण्यात आली आहे.
अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले
मटका जुगार आणि अवैध दारू व्यवसायामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक दुष्परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर रेवदंडा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अशा व्यवसायांमध्ये गुंतलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सपोनि सुजित गडदे यांच्या नेतृत्वाखाली रेवदंडा पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून असून, यापुढेही अशा प्रकारच्या गैरकृत्यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रेवदंडा पोलीस ठाण्याच्या या धडक मोहिमेचे परिसरात लक्ष वेधले जात आहे.




