रामफेडच्या प्रशिक्षण कार्यालयाचे नागाव येथे उद्घाटन; आयआयबीएफच्या सहकार्याने दोन दिवसीय प्रशिक्षणाला प्रारंभ
रायगडच्या सहकार क्षेत्राला कौशल्यविकासाचे नवे बळ!
रामफेडच्या प्रशिक्षण कार्यालयाचे नागाव येथे उद्घाटन; आयआयबीएफच्या सहकार्याने दोन दिवसीय प्रशिक्षणाला प्रारंभ
रेवदंडा : महेंद्र खैरे
रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, आधुनिक आणि कौशल्यपूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने तसेच रायगड जिल्हा एम-पॅक्स सहकारी संस्थांचा महासंघ मर्यादित (रामफेड), अलिबाग यांच्या पुढाकाराने सहकारी संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कौशल्यविकास प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत रामफेडच्या प्रशिक्षण कार्यालयाचे उद्घाटन आणि दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नागाव येथे करण्यात आला.
या कार्यक्रमाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (आयआयबीएफ)च्या पश्चिम विभागीय व्यावसायिक विकास केंद्राचे प्रमुख कुलदीप जिंदाल, प्राध्यापक अरुण मिश्रा, अतिथी प्राध्यापक आर. कांचनमाला, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, रामफेडचे अध्यक्ष निनाद पाटील, उपाध्यक्ष तुकाराम पाटील, विशेष कर्तव्य अधिकारी श्रीकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी हा दिवस रायगडच्या सहकार क्षेत्रासाठी ऐतिहासिक असल्याचे नमूद केले. आयआयबीएफ आणि रामफेड यांच्यात झालेला सामंजस्य करार हा देशातील सहकार क्षेत्रातील पहिलाच करार असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांकडून दर्जेदार प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. बदलत्या बँकिंग प्रणालीसोबतच आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय कामकाजाचे अद्ययावत ज्ञान कर्मचाऱ्यांना असणे काळाची गरज आहे. आगामी दोन वर्षांत रामफेडच्या माध्यमातून व्यापक प्रशिक्षण उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आयआयबीएफचे पश्चिम विभागीय प्रमुख कुलदीप जिंदाल यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देताना, १९२८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेची २०२८ मध्ये शंभर वर्षांची वाटचाल पूर्ण होणार असल्याचे सांगितले. बँकिंग क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी आयआयबीएफ सातत्याने कार्यरत आहे. सध्याच्या बदलत्या बँकिंग व्यवस्थेत नवीन नियमावली, कर्जविषयक कामकाज, आर्थिक व्यवहार, जोखीम व्यवस्थापन, ग्राहकसेवा आणि डिजिटल तंत्रज्ञान यांची माहिती असणे अत्यावश्यक आहे. रामफेडसोबतच्या सामंजस्य करारामुळे ग्रामीण भागातील सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात कर्ज प्रकरणांची हाताळणी, कर्जवसुली, आर्थिक व्यवहार, लेखा व्यवस्थापन, ग्राहकसेवा, बँकिंग क्षेत्रातील बदल तसेच सहकारी संस्थांचे दैनंदिन कामकाज अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
रामफेडच्या स्वतंत्र प्रशिक्षण कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षण आणि ज्ञानवृद्धीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहकार्य, रामफेडचा पुढाकार आणि आयआयबीएफचे तज्ज्ञ मार्गदर्शन यांची सांगड घालणारा हा उपक्रम जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाच्या बळावर सहकारी संस्थांच्या कामकाजात गुणवत्ता, कार्यक्षमता आणि आधुनिकता वाढण्यास मदत होणार आहे.




