पाले पुलाचा संरक्षण कठडा कोसळला; नवीन पुलासाठी नागरिकांचा आक्रोश दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष; सरपंच हर्षदा मयेकर यांचा संतप्त सवाल
पाले पुलाचा संरक्षण कठडा कोसळला; नवीन पुलासाठी नागरिकांचा आक्रोश
दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष; सरपंच हर्षदा मयेकर यांचा संतप्त सवाल
रेवदंडा, दि. २८ जून (वार्ताहर):
अलिबाग तालुक्यातील नागावजवळील पाले पुलावरील संरक्षण कठडा शनिवारी पहाटे अचानक कोसळल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुलाची जीर्ण अवस्था पुन्हा एकदा समोर आली असून, प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. हर्षदा निखिल मयेकर यांनी केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना पाले पुलाच्या धोकादायक स्थितीबाबत वारंवार निवेदने देण्यात आली. प्रत्यक्ष भेटी घेऊनही पुलाच्या मजबुतीकरणाबाबत ठोस निर्णय झाला नसून केवळ तात्पुरत्या दुरुस्तीवरच समाधान मानण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे.
सध्या बेली पूल कमकुवत झाल्यामुळे एस.टी. बससेवा बंद असून संपूर्ण जड वाहतूक पाले पुलावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे पुलावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत संरक्षण कठडा कोसळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच सरपंच हर्षदा मयेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलिबाग कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र, ही केवळ तात्पुरती उपाययोजना असून नवीन पुलाची उभारणी हाच कायमस्वरूपी तोडगा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी महाड येथील सावित्री नदीवरील पूल दुर्घटना तसेच नुकत्याच सोलापूर जिल्ह्यातील तांदूळवाडी येथील दुर्घटनेचा संदर्भ देत, अशा प्रकारची घटना पाले पुलावर घडू नये यासाठी प्रशासनाने वेळीच निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
रविवारी नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेण्यात येणार असून, नवीन पाले पुलाच्या उभारणीचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे तसेच विद्यमान पुलाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच मयेकर यांनी दिली.
पावसाळ्यात तसेच रात्रीच्या वेळी या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
चौकट
“आश्वासनं नकोत, आता निर्णय हवा!”
“गेल्या दोन वर्षांपासून आम्ही सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधत आहोत. आज संरक्षण कठडा कोसळला आहे, उद्या पूल कोसळला किंवा मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवून नवीन पुलाच्या कामाला तातडीने सुरुवात करावी.”
— सौ. हर्षदा निखिल मयेकर,
सरपंच, नागाव ग्रामपंचायत
