ताज्याघडामोडी

रेवदंडा बायपास रस्त्यावर अनाधिकृत डंपिंग ग्राउंड; पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेची मागणी

रेवदंडा बायपास रस्त्यावर अनाधिकृत डंपिंग ग्राउंड; पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेची मागणी

रेवदंडा, प्रतिनिधी : रेवदंडा बायपास रस्त्यावर अनाधिकृत डंपिंग ग्राउंड निर्माण झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रवासी व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना संबंधित प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून हा कचरा हटवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

रेवदंडा बायपास परिसरात काही नागरिकांकडून केरकचरा तसेच इतर घनकचरा टाकण्यात येत असल्याने तेथे अनधिकृत डंपिंग ग्राउंड तयार झाले आहे. कचऱ्याचा ढीग दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण परिसर दुर्गंधीयुक्त बनला आहे. यामुळे येथून जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचे टोळके परिसरात कायम वावरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. बायपास मार्गावरून मुरूड, रोहा तसेच अलिबाग तालुक्याकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. पर्यटकांची वाहनेही या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे गावाच्या प्रवेशद्वारावरच निर्माण झालेले हे अनधिकृत डंपिंग ग्राउंड रेवदंडाच्या स्वच्छ व सुंदर प्रतिमेला गालबोट लावत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या मते, काही काळ ग्रामपंचायतीची घंटागाडी सेवा बंद राहिल्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी कचरा टाकण्यास सुरुवात केली. तसेच घंटागाडीच्या वेळांचे योग्य नियोजन नसल्याने अनेकांना नियमित सेवा उपलब्ध होत नसल्याची तक्रारही करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, रेवदंडा बायपासच्या अवघ्या दीड किलोमीटर परिसरात अशा स्वरूपाची आणखी दोन अनधिकृत डंपिंग स्थळे तयार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

पावसाळ्यात कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागाने तातडीने कारवाई करून अनधिकृत डंपिंग ग्राउंड हटवावे व परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी ग्रामस्थ, प्रवासी व विविध स्तरांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *