नागाव बीच नारळ फोंडी स्पर्धा उत्साहात संपन्न
जि.प.सदस्य डाँ.सचिन राऊळ व राकेश राणे मित्रमंडळ आयोजीत

हातावरील नारळ फोंडी शैलेश नाईक प्रथम, गडगडी नारळ फोंडी स्पर्धेत म्ाल्हार बामजी प्रथम
रेवदंडा-महेंद्र खैरे-जि.प.सदस्य डाँ.सचिन राऊळ व राकेश राणे मित्रमंडळाचे वतीने आयोजीत करण्यात आलेल्या भव्य खेळी नारळ फोंडी स्पर्धा 2026 उत्साहपुर्ण वातावरणात पार पडली. नागाव बिच नजीक दर्यावर्दी क्रिडा मंडळ, नागाव बंदर येथील क्रिडांगणात संपन्न झालेल्या या स्पर्धेला आमदार महेंद्र दळवी, जि.प.अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उदयोजक राम घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली,या स्पर्धेला स्पर्धक व नारळ फोंडी स्पर्धा रसिक प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेचा शुभारंभ कार्यक्रमांस नागाव ग्रा.प.सरपंच हर्षदाताई मयेकर,शरद राऊळ, नागाव ग्रा.प. माजी सरपंच नंदुशेठ मयेकर, नागाव ग्रा.प.सदस्या अंकिता शेवडे, शिवसेना अलिबाग-मुरूड संघटक तनुजा घरत, नागाव ग्रा.प.सदस्य निखिल मयेकर, कल्पना काटे, निकिता पाडेकर,मोहन ठाकूर, राणे, सदिच्छा राऊळ, सिया राऊळ आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी नागाव ग्रा.प.सरपंच हर्षदा मयेकर यांचे हस्ते पुजाअर्चा व शरद राऊळ यांचे हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
स्पर्धेला आमदार महेंद्र दळवी व जि.प.अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली,तर त्याचे समवेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेश चव्हाण, उदयोजक राम घरत यांचीही उपस्थिती होती. दरम्यान आयोजक सचिन राऊळ यांचे हस्ते उपस्थित प्रमुख अतिथीचा शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून त्याचा सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धेच्या आयोजनातून कार्यकर्ता निर्माण होतो, सचिन राऊळ गर्दी कशी जमविण्याचे कसब ठेवले, म्हणूनच राजकारणात मुसंडी मारली असे उद्गार आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काढले तर जि.प.अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी मार्गदशन करताना सचिन राऊळ यांचे स्पर्धा आयोजनाचे कौतुक केले. तत्पुर्वी स्पर्धेचा शुभारंभास उपस्थित मान्यवरांचे स्वागत सदिच्छा राऊळ व सचिन राऊळ या उभयंतानी शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून केले.
प्रथम दुपारी ठिक तिन वाजता, गडगडी नारळ फोंडीने स्पर्धेला प्रारंभ झाला, यामध्ये एकूण 32 संघानी सहभाग घेतला, स्पर्धेत प्रथम क्रमांक मल्हार बामजी, व्दितीय क्रमांक वरद धाटावकर, तृतीय क्रमांक प्रसाद किर, चतुर्थ क्रमांक मोहन घरत,यांनी क्रमांक पटकाविले तर उत्कृष्ट मारेकर प्रदिप हाले यांची निवड करण्यात आली. या मध्ये प्रथम क्रमांकास रूपये 22 हजार व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास रूपये 11 हजार व भव्य चषक, तृतीय क्रमांकास रूपये 7 हजार व भव्य चषक,चतुर्थ क्रमांकास रूपये 7 हजार व भव्य चषक तसेच उत्कृष्ट मारेकरी भव्य चषक अशी बक्षिसे होती.
सायकांळी 7 वाजता हातावरचे नारळ फोंडी स्पर्धेस प्रारंभ झाला, यामध्ये एकूण 40 संघानी सहभाग घेतला, स्पर्धेत प्रथम क्रमांक शैलेश नाईक, व्दितीय क्रमांक किरण राऊत-संकेत बना, तृतीय क्रमांक दृष्टी सारंग, चतुर्थ क्रमांक मोहन घरत, यांनी पटकाविला तर उत्कृष्ट संघ महेश किर यांची निवड करण्यात आली. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रूपये 51 हजार व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास 21 हजार व भव्य चषक, तृतीय क्रमांकास रूपये 11 हजार व भव्य चषक, चतुर्थ क्रमांकास रूपये 11 हजार व भव्य चषक व उत्कृष्ट संघ भव्य चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती.
स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम जि.प.सदस्य डाँ. सचिन राऊळ आणि मित्रमंडळाचे हस्ते पार पडला, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन, व स्पर्धेचे धावते वर्णन विकास पिंपळे व संतोष वाघमारे यांनी केले. तर स्पर्धेसाठी दिपेश पाटील, प्रथमेश कोळसेकर, प्रथमेश बनिया,कल्पेश खारकर, संदेश गायकर, काटकर, विपुल राऊळ, व संदेश नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी आभार स्पर्धेचे आयोजक जि.प.सदस्य डाँक्टर सचिन राऊळ यांनी व्यक्त केले.
फोटो क्रमांक 1. प्रथम क्रमांकाचे भव्य चषक व रोख रक्कमेचे पारितोषीक शैलेश नाईक यांना वितरीत करताना, जि.प.सदस्य डाँ.सचिन राऊळ व मित्रमंडळ
फोटो क्रमांक 2. स्पर्धेत नारळ फोडीचा आनंद घेताना, आमदार महेंद्र दळवी व जि.प. अध्यक्ष मंगेश वाकडीकर
