उमटे धरणातील 45 वर्षांचा गाळ : रायगडच्या शेतकऱ्यांची GAIL कडे CSR मदतीची मागणी
उमटे धरणातील 45 वर्षांचा गाळ : रायगडच्या शेतकऱ्यांची GAIL कडे CSR मदतीची मागणी
रेवदंडा-महेंद्र खैरे- रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळाचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. गेल्या 45 वर्षांत धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणीसाठा क्षमतेत मोठी घट झाली आहे. त्याचा थेट फटका स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि जनावरांना बसत आहे.
आठवड्यातून एकदाच पाणी
उमटे धरण संघर्ष ग्रुप, रायगड यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गाळामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सध्या गावांना आठवड्यातून फक्त एक ते दोन वेळाच पाणीपुरवठा होतो. पाणीटंचाईमुळे शेती आणि पर्यावरणाचा समतोलही बिघडला आहे.
प्रशासनाकडे 10 वर्षांपासून पाठपुरावा, पण कार्यवाही नाही
संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष ॲड. राकेश नारायण पाटील यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून रायगड जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही गाळ काढण्याचे काम झालेले नाही. धरणातील गाळ काढणे ही प्रशासनाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी असतानाही 45 वर्षे दुर्लक्ष झाले आहे.
GAIL कडे CSR मदतीची मागणी
आता उमटे धरण संघर्ष ग्रुपने GAIL कंपनीकडे धाव घेतली आहे. 20 मे 2026 रोजी GAIL ला दिलेल्या निवेदनात त्यांनी आर्थिक मदत न मागता, CSR/CER अंतर्गत पोकलेन, JCB, डंपर यांसारखी यंत्रसामग्री किंवा तांत्रिक सहाय्य देण्याची विनंती केली आहे. GAIL ने हे निवेदन संख्या 5209 नुसार प्राप्त केले आहे.
“पाणी हा मुलभूत हक्क”
निवेदनाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “हा संगर केवळ पाण्यासाठी नसून, मानवी मुलभूत हक्कांसाठी आहे” या वाक्याने करण्यात आली आहे. पाणी हा मानवी हक्क असून त्यासाठी लढा सुरूच राहील, अशी भूमिका संघर्ष ग्रुपने मांडली आहे.
संघर्ष ग्रुपने GAIL कडे स्थळ पाहणी करून तातडीने CSR अंतर्गत मंजुरी देण्याची मागणी केली आहे. लोककल्याण, जलसंधारण व पर्यावरण रक्षणासाठी कंपनीने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


