ताज्याघडामोडी

“रोबोटिक बोयो” ठरतोय खऱ्या अर्थाने जीवनरक्षक..! -विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल

“रोबोटिक बोयो” ठरतोय खऱ्या अर्थाने जीवनरक्षक..!
-विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल

रेवदंडा-महेंद्र खैरे- नागाव बीच येथे आज पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तींना तात्काळ मदत व बचावकार्य करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असलेल्या “रोबोटिक बोयो” या आधुनिक जीवरक्षक यंत्राचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या प्रात्यक्षिकाला कोकण विभागीय आयुक्त मा. श्रीमती रुबल अग्रवाल यांनी उपस्थित राहून यंत्रणेची कार्यपद्धती जाणून घेतली व या उपक्रमाचे कौतुक करत “रोबोटिक बोयो खऱ्या अर्थाने जीवनरक्षक ठरत आहे” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली.

यावेळी नागांव माजी सरपंच श्री. नंदकुमार मयेकर, सरपंच सौ. हर्षदा मयेकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्रशासनातील व ग्रामपंचायत नागांव अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भेटीदरम्यान विभागीय आयुक्तांनी नागाव बीचवरील पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत, शौचालयांची संख्या वाढविण्याबाबत तसेच पर्यटकांची माहिती संकलित करण्यासाठी प्रभावी व्यवस्था उभारण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या.

सरपंच सौ. हर्षदा मयेकर यांच्या नेतृत्वाखाली नागाव ग्रामपंचायत आणि संपूर्ण ग्रामपंचायत टीम सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून नागावला सुरक्षित, स्वच्छ, आधुनिक आणि पर्यटकांसाठी आदर्श पर्यटनस्थळ बनविण्याच्या दिशेने प्रभावी काम करत आहे. बीच सुरक्षा, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, आधुनिक सुविधा आणि पर्यटन विकास यांचा समतोल साधत ग्रामपंचायतने अनेक अभिनव प्रकल्प यशस्वीपणे राबविले आहेत.

“रोबोटिक बोयो” सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा नागावच्या पर्यटन विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून नागाव बीच भविष्यात राज्यातील सर्वात सुरक्षित आणि आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून निश्चितच आपली वेगळी ओळख निर्माण करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *