रेवदंडा–सालाव खाडी पूल प्रकल्पाला वेग; कोस्टल हायवेचा महत्त्वाचा दुवा साकारतोय
रेवदंडा–सालाव खाडी पूल प्रकल्पाला वेग; कोस्टल हायवेचा महत्त्वाचा दुवा साकारतोय
रेवदंडा | प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा ते साळाव दरम्यान कुंडलिका खाडीवर उभारण्यात येत असलेल्या बहुचर्चित पुलाच्या कामाला आता वेग आला असून, हा पूल भविष्यात कोकण किनारपट्टीच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) माध्यमातून राबविण्यात येणारा हा प्रकल्प Revas-Reddi Coastal Highway (MSH-4) चा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जात आहे.
सध्या खाडीपात्रात पाइल फाउंडेशन व पिलर उभारणीची कामे युद्धपातळीवर सुरू असून, अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारा हा प्रकल्प कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
सुमारे ३.८२९ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात जोडरस्त्यांसह आधुनिक ४ मार्गिकांचा पूल उभारण्यात येणार आहे. पुलाची रचना ताशी ८० किलोमीटर वेगाने वाहतूक सुरळीत पार पडेल, अशा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात येत आहे. तसेच पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई, पादचाऱ्यांसाठी फूटपाथ आणि युटिलिटी लाईन्सची स्वतंत्र सुविधा असणार आहे.
या पुलामुळे अलिबाग तालुक्यातील रेवदंडा आणि मुरुड तालुक्यातील साळाव यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित होणार आहे. परिणामी अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन यांसारख्या शहरांमधील प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे. मुंबई आणि पुण्याहून मुरुड-जंजिरा, काशिद, रेवदंडा समुद्रकिनारा या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांचाही प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
५२३ किलोमीटर लांबीच्या आणि अंदाजे ₹२६ हजार कोटी खर्चाच्या Revas-Reddi Coastal Highway प्रकल्पामध्ये एकूण ९ मोठ्या खाडी पुलांचा समावेश आहे. धरमतर, आगरदांडा, बाणकोट, दाभोळ, जयगड, केळशी आणि काळबादेवी खाड्यांवरील पुलांसह रेवदंडा–साळाव पुलालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या पुलाचे बांधकाम प्रसिद्ध पायाभूत सुविधा कंपनी Ashoka Buildcon Ltd कडून करण्यात येत असून, भूमीपूजनानंतर कामाने चांगली गती घेतली आहे. सध्याचा जुना रेवदंडा पूल अरुंद आणि वाहतुकीस अपुरा ठरत असल्याने नवीन पुलामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
कोस्टल हायवे आणि हा नवीन पूल पूर्ण झाल्यानंतर कोकणातील पर्यटन, मत्स्यव्यवसाय, उद्योग, वाहतूक आणि स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळणार असून, अलिबाग ते सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील प्रवास अधिक आधुनिक आणि वेगवान होणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


