रेवदंडा येथे श्री महाकाली देवी यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न
रेवदंडा येथे श्री महाकाली देवी यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न
रेवदंडा-महेंद्र खैरे- त्वष्टा कांसार ज्ञाती संस्थान, रेवदंडा यांच्या वतीने श्री महाकाली देवीची वाडी भरणे व वार्षिक यात्रा महोत्सव रविवार दि. १७ मे २०२६ रोजी श्री महाकाली मंदिर, चौल द. भाग (कालिका टाकी) येथे मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.
सकाळी ८:३० वाजता श्री चंद्रकांत गो. दांडेकर यांच्या निवासस्थानापासून निघालेल्या भव्य पालखी सोहळ्याने परिसर दुमदुमून गेला. सकाळी ११ वाजता श्री केदार व सौ. राधिका निजामपूरकर, पुणे यांच्या हस्ते देवीची महापूजा व वाडी भरणे सोहळा विधिवत पार पडला. दुपारी १ वाजता झालेल्या महाआरतीनंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सौ. डॉ. निलम किशोर हजारे, श्री अॅड. किशोर मधुकर हजारे (अलिबाग) तसेच उद्योजक सौ. तन्वी सागर हजारे, श्री सागर प्रदिप हजारे (पेण) उपस्थित होते. संस्थेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दुपारी २ ते ५ स्थानिक महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व सायंकाळी ५:३० ते ७:३० श्री महाकाली भजन मंडळाच्या भजनाने भाविक मंत्रमुग्ध झाले.
संस्थेचे अध्यक्ष श्री ऋषी राजन वडके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाह श्री गणेश सुरेश वडके, खजिनदार श्री अमोल शशिकांत वडके, सदस्य श्री ओमकार सुरेश वडके, श्री प्रशांत विजय वडके, सल्लागार श्री शंकर वसंत वडके व श्री मंगेश शांताराम वडके यांनी यशस्वी आयोजन केले. समस्त त्वष्टा कांसार कार्यकर्ते व श्री महाकाली महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले.


