ताज्याघडामोडी

सागमळा वॉर्ड क्रमांक ४ मधील रस्ते विकासकामांचे लोकार्पण उत्साहात संपन्न

सागमळा वॉर्ड क्रमांक ४ मधील रस्ते विकासकामांचे लोकार्पण उत्साहात संपन्न

रेवदंडा | प्रतिनिधी

चौल ग्रामपंचायत हद्दीतील सागमळा वॉर्ड क्रमांक ४ मधील कोलाड गल्ली व नाईक गल्ली येथील रस्ते विकासकामांचे लोकार्पण शुक्रवारी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यास रायगड जिल्हा परिषद सदस्य सचिनजी राऊळ तसेच पंचायत समिती सदस्या अंकिता ताई घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक विधी व भूमिपूजनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रस्ते विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या रस्त्यांच्या समस्येवर या कामामुळे प्रभावी तोडगा निघणार असून परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

लोकार्पणानंतर आयोजित छोटेखानी सत्कार समारंभात ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिकांनी विकासकामांबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे आभार मानले.

कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही कटिबद्ध राहणार असल्याचे आश्वासन उपस्थित लोकप्रतिनिधींनी दिले.

या लोकार्पण सोहळ्यामुळे सागमळा परिसरात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी विकासकामांचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *