मिठेखार येथील देवी मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहात; आमदार महेंद्र दळवी यांचे भक्तिभावाने दर्शन
मिठेखार येथील देवी मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहात; आमदार महेंद्र दळवी यांचे भक्तिभावाने दर्शन
मोहन ठाकूर, रमेश गायकर यांच्या वतीने स्वागत; पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी गर्दी
रेवदंडा : महेंद्र खैरे
मुरूड तालुक्यातील बिर्ला नजीक असलेल्या मिठेखार येथील देवी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या या देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त मिठेखार ग्रामस्थ मोहन ठाकूर आणि रमेश गायकर यांच्या निमंत्रणावरून आमदार महेंद्र दळवी यांनी शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास मंदिराला भेट देऊन देवीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. सन २०१४ पासून आमदार महेंद्र दळवी हे दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात मिठेखार येथील देवी मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
यावेळी मुरूड पंचायत समितीचे सभापती निलेश घाटवल, ज्येष्ठ कार्यकर्ते सी. एम. ठाकूर, पंचायत समिती सदस्य संतोष निगडे, दिनेश मिनमिने, वरंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुधीर चेरकर, शिवसेनेचे मुरूड उपतालुका प्रमुख भगीरथ पाटील, चंद्रकांत मोहिते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
मंदिरात आगमन झाल्यानंतर मिठेखार ग्रामस्थांच्या वतीने मोहन ठाकूर यांनी आमदार महेंद्र दळवी यांचे स्वागत केले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोहन ठाकूर आणि रमेश गायकर यांनी आमदार महेंद्र दळवी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उपस्थित मान्यवरांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भक्तिमय वातावरणामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने मिठेखार येथील नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
