ताज्याघडामोडी

चौल येथील वृद्ध महिलेच्या खुनाचा ४८ तासांत उलगडा; जावयासह चौघे आरोपी ताब्यात

चौल येथील वृद्ध महिलेच्या खुनाचा ४८ तासांत उलगडा; जावयासह चौघे आरोपी ताब्यात
रेवदंडा-महेंद्र खैरे- रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील चौल येथील टेकाळकर आळी येथे राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या खून व जबरी चोरी प्रकरणाचा रायगड पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उलगडा केला असून, मयत महिलेचा जावई असलेल्या मुख्य आरोपीसह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मंदा प्रमोद म्हात्रे (वय ७०) या वृद्ध महिला चौल, ता. अलिबाग येथे एकट्याच राहत होत्या. दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या पूर्वी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांचा खून केला व अंगावरील सोन्याचे दागिने जबरी चोरीने लंपास केले. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे (अलिबाग विभाग) व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले.
सपोनि भास्कर जाधव, सपोनि मानसिंग पाटील, सपोनि भैरु जाधव, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार – अमोल हंबीर, अमोल म्हात्रे, अक्षय पाटील, प्रदीप खरात, रवि मुंडे, शरद फरांदे, विनोद पाटील, तुषार घरत (सायबर), रुपेश निगडे, सचिन वावेकर, प्रशांत लोहार आदींच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी क्र. १ महादेव ऊर्फ शिवा राधाकिसन ढोबळे (वय २५, रा. जाटदेवळा, ता. पाथडी, जि. अहिल्यानगर) यास आष्टी, जि. बीड येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपी क्र. २ अशोक अजिनाथ भोसले (वय १९) व आरोपी क्र. ३ गणेश उत्तम पंडागळे (वय २५) यांना जाटदेवळा, ता. पाथडी, जि. अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली. तर आरोपी क्र. ४ शुभम एकनाथ पवार (वय २३, रा. माणिक दवंडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यास पेण, जि. रायगड येथून ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक तपासात आरोपी महादेव ऊर्फ शिवा ढोबळे हा मयत महिलेचा जावई असल्याचे निष्पन्न झाले आहे. वृद्ध महिला घरात एकट्या राहत असल्याची माहिती आरोपींना होती. त्याचा फायदा घेत आरोपींनी घरात प्रवेश करून खून व चोरी केल्याचे तपासातून समोर आले आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे सपोनि भैरु जाधव करीत असून, आरोपींनी खून नेमक्या कोणत्या कारणास्तव केला, तसेच चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्याबाबतचा तपास सुरू आहे.
अवघ्या ४८ तासांत गंभीर गुन्ह्याचा उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आल्याने पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *