मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शैलेश खोत यांची नियुक्ती
रेवदंडा-महेंद्र खैरे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरूड तालुक्यातील झंझावात अशी ओळख निर्माण करणारे शैलेश खोत यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले.
मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलिबाग व मुरूड विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविताना मनसेचे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र दिले. मुरूड तालुक्यातील काशिद ग्रा.प. हद्दीतील सर्वे येथील रहिवाशी असलेले शैलेश खोत यांनी अल्पावधीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भक्कम व क्रियाशील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन मनसैनिक म्हणून त्यांनी राजकीय प्रवासात सुरूवात केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विविध पदावर त्यांनी काम केले असून मनसेचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येये धोरणे, व कार्यक्रम संघटनेत निष्ठेने राबवावी, यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई अथवा तडजोड स्विकारली जाणार नाही, तसेच आपल्या सहकार्याकडून समाजाला कोणत्याही प्रकारे उपद्रव होणार नाही असे वर्तन अपेक्षीत तसेच मराठी बांधवाना, भगिनीना व माताना अभिमान वाटेल असे कार्य करावे असे या नियुक्तीपत्र अध्यक्ष राज ठाकरे यांचे आदेश आहेत, तसेच ही नियुक्ती फक्त एक वर्षाची असून कार्याचा अहवाल पाहून पुढील मुदतीचा निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे. या नियुक्तीपत्रावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्वाक्षरी आहे.