नागाव मधील प्राचीनकालीन प्रसिध्द श्री वंखनाथ मंदिर
नागाव मधील प्राचीनकालीन प्रसिध्द श्री वंखनाथ मंदिर
महेंद्र खैरे, रेवदंडा
आंग्रेकालीन अष्टागरातील अनेक प्रसिध्द मंदिरे आजही पहावयास मिळतात, नागावच्या खारगल्ली नजीकचे श्री वंखनाथ मंदिर त्यापैकीच एक आहे. अलिबागहून चौलकडे जाताना, अगदीच 10 कि.मी. अंतरावर मुख्यः रस्त्यालगत हे मंदिर आहे. निसर्गरम्य सानिध्यात वसलेले मंदिर प्रथमदर्शनी फारसे जुने वाटत नाही, मात्र निट निरीक्षण केल्यास हे मंदिर बांधकाम जुने असल्याचे निदर्शनास येते. विशेष म्हणजे श्री वंखनाथ मंदिर मंदिरासमोरील पुष्करणी फारच सुंदर व आकर्षक आहे. साधारतः 50 फुट लांब व तेव्हढयाच रूंदीच्या चौकोनी आकारातील या पुष्करणीचे काम काळया घडीव दगडांमध्ये केलेले आहे, पाण्याची पातळी कमी असताना, यातील सुंदर कोरीव काम पहाताना मन मोहरून जाते. या पुष्करणीच्या चारही बाजूना कोष्टकांमध्ये नक्षीकाम दिसते, ते पहाण्यासारखे आहे.
आंग्रेकालीन अष्टागर या पुस्तकामध्ये श्री वंखनाथ मंदिराचे बांधकाम 1763 मध्ये पुर्ण झाल्याचे नमूद केले आहे, तसेच बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या कुलाबा गॅझेटमध्ये या मंदिराचा बांधकामाचा काळ 1790 सांगितला आहे, असा उल्लेख कुलाबा गॅझेट 1883 आवृत्तीत लक्ष्यात येतो. या काळात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या निधीतून केशव महाजन या नागावच्या गृहस्थांनी या मंदिराचे बांधकाम पार पडले तसेच त्याचवेळी केशव महाजन यांनी दक्षिणेकडील डोंगराजवळ मुस्लिम ग्रामस्थांसाठी एक मशीद बांधली होती, या दोन्ही बांधकामाचा एकूण खर्च त्यावेळी पाउण लाख रूपये झाला होता, असे लिखीत आढळते.
या मंदिराबाहेर एक सुंदर तुळशी वृंदावन आहे, मंदिराला दोन सभामंडप असून बाहेरील सभामंडप मोठया सभामंडपाचे बांधकाम अलिकडील काळात सिमेंट कॉक्रिट वापरून केले आहे. ज्यामुळे मंदिराचे प्राचीनत्व झाकोळले गेले आहे. आतील सभामंडप आणि गाभारा काळया घडीव दगडानी बनविलेला आहे. येथील फरशीचे काम अलीकडेच केलेले आहे. येथे दिसणारा नंदी काळया दगडात घडवलेला आहे. गाभार्याच्या दगडा दरवाज्याजवळ भिंतीमधील कोष्टकामध्ये श्री गणेश व भैरवाच्या सुंदर मुर्ती आहेत. गाभार्याच्या प्रवेशद्वारावरील शिल्पे पहाण्यासारखी आहेत. यातील वैशिष्टपुर्ण शिल्पे म्हणजे छतावरी श्री कृष्णाच्या चरित्रातील देखावा आणि दरवाज्याच्या चौकटीतील दोन्ही बाजूंना व्दारपालाच्या वर दिसणारे पिसारा फुलवलेला मोर, फारच आकर्षक आहे. शिवमंदिरात क्वचीतच अशी कृष्ण पिसे पहावयास मिळतात. प्रवेशव्दाराजवळ जमिनीवरील दगडात सुंदर कोरीव काम केलेले आहे. गाभार्याच्या आत शिवलिंग आहे. त्यावर सोनेरी साज चढविलेला आहे. शिवलिंगाच्या मागे पार्वतीची मुर्ती दिसते. बाहेरून मंदिराकडे पाहिल्यास दोन सभामंडपावर व एक गर्भगृहाच्या घुमटावरील असे मंदिराचे तिन कळस दिसतात. या मंदिराबाबत अजून एक वैशिष्ट पुर्ण बाब म्हणजे येथील घुमटावरील कमळाच्या पाकळयांमध्ये नक्षीकामाजवळ आहिल्याबाईच्या चेहर्याचे शिल्प कोरले आहे. ते शिल्प मंदिराच्या समोरील व मागील बाजूस कोरलेले आहे. थोडया दुरूत कळसाच्या थोडे खाली पाहिल्यास हे शिल्प पहाता येते. बाहेरील चौथर्यावरहज नक्षीकाम या मंदिराच्या कलात्मकतेत अजूनही भर घालते.