रेवदंडयातील साईराज अर्पाटमेंट बिल्डीगचे सांडपाणी हरेश्वर मैदानात
रेवदंडयातील साईराज अर्पाटमेंट बिल्डीगचे सांडपाणी हरेश्वर मैदानात
ठेकेदार व रहिवाशी यांचे विरोधात युवावर्गाचा असंतोष
रेवदंडा-महेंद्र खैरे- शौचालयाचे सांडपाणी चक्क हरेश्वर मैदानात येत असल्याने तेथे दुर्गधी पसरली असून आरोग्यास अपायकारण परिस्थीती निर्माण झाली आहे. सदर शौचालयाची पाणी गेले वर्षभर नजीकच्या साईराज अर्पाटमेंट मधून वाहत आहे. अखेर रेवदंडयातील हरेश्वर मैदानात खेळणारा युवावर्गाने याबाबत ठेकेदार व तेथील रहिवाशी यांचे विरोधात असंतोष व्यक्त केला आहे.
रेवदंडा प्राथमिक शाळे नजीक समुद्राकडे जात असलेल्या रस्ता लगत साईकृपा बिल्डींग ठेकेदार प्रसाद गोंधळी व इतर यांनी विकसीत केली आहे. या बिल्डींग बांधकाम करताना परवानगी देण्यापुर्वी संबधीतानी शौचालय पाण्याची विल्हेवाट व सुविधा यांची पडताळणी न केल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. सदर समस्या अतिशय भीषण स्वरूपाची बनली आहे. या साईकृपा बिल्डींगचे सांडपाण्यासाठी योग्य सुविधा निर्माण करण्यात आली नसल्याने बिल्डींग मधील रहिवाशी कोणतीही खबरदारी न घेता गेले वर्षेभर गटाराव्दारे हरेश्वर मैदानात सांडपाणी सोडत आहेत. या सांडपाण्याच्या दुर्गधीने रस्ताने जा-ये करणारे पादचारी, तसेच या मार्गाने समुद्राकडे जा-ये करणारे पर्यटक, ग्रामस्थ यांना अतोनात त्रास सहन करत जावे लागते. सदर दुर्गधीयुक्त सांडपाणी थेट रेवदंडा हरेश्वर मैदानात जात असल्याने तेथे खेळत असलेल्या युवावर्गाचा क्रिकेटचा चेंडू वारंवार या सांडपाण्यात जातो. परिणामी हरेश्वर मैदानातील येत असलेले पाणी त्वरीत बंद करावेे अशी मागणी येथील युवावर्गाने केली आहे. अन्यथा तेथील गटार लाईन पुर्णतः बुजवून बंद करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत अनेकदा स्थानिक रहिवाशी, ग्रामस्थ यांनी अनेकदा संबधीताकडे तसेच रेवदंडा ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज व निवेदने दिले आहे. याबाबत रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल मोरे व त्यावेळेचे ग्रामविकास अधिकारी दिवकर यांनी संबधीत ठेकेदार व तेथील रहिवाशी यांना याबाबत नोटीस बजावून दुर्गधीचे पाणी बंद करणेबाबत नोटीसा जारी केल्या होत्या. मात्र या सांडपाणी निचरा होण्यासाठी व करण्यासाठी पर्यायी मार्गच नसल्याने ही समस्या कायम तशीच राहीली आहे. गेले वर्षभर या सांडपाणी विरोधात तक्रार अर्ज व निवेदने संबधीताना दिले आहे. याबाबत ग्रामपंचायतीने सुध्दा दखल घेवून सरपंच प्रफुल्ल मोरे यांनी संबधीत ठेकेदार व रहिवाशी यांचेशी संवाद साधला होता. मात्र संबधीत साईकृपा अपार्टमेंट मधील ठेकेदार व रहिवाशी सदर सांडपाण्याची विल्हेवाट न लावता बिनधोकपणे हरेश्वर मैदानात गटाराव्दारे सोडत आहेत. याबाबत ठेकेदार व बिल्डींगचे रहिवाशी यांचेवर त्वरीत कारवाई व्हावी अशी मागणी येथील युवावर्ग तसेच शेकापक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते संदिप खोत यांनी केले आहे.