ताज्याघडामोडी

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठरली संस्थांचे संगणकीकरण करणारी देशातील पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक!

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठरली संस्थांचे संगणकीकरण करणारी देशातील पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक!
रेवदंडा-महेंद्र खैरे- ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कामकाज गतिमान व पारदर्शक व्हावे,यासाठी देश पातळीवर संस्थांचे संगणकीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठ्या उत्साहाने संस्थाचे संगणकीकरणाचे काम सक्षमपणे पुर्ण केले. हे उपक्रम राबविणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातील एकमेव बँक ठरली असून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कामगिरी खऱ्या अर्थाने कौतूकास्पद आहे, असे गौरवोद्गार नाबार्डचे चेअरमन शाजी के.व्ही यांनी काढले. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा संगणकीकरण कार्यपूर्ती सोहळा शुक्रवारी(दि.11) अलिबागमध्ये आयोजित करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन जयंत पाटील, उपाध्यक्ष सुरेश खैरे, राज्य सहकार निवडणूक आयुक्त अनिल कवडे, नाबार्डचे सीजीएम संजयकुमार गुप्ता, सीजीएम रश्मी दराड, लेखापरिक्षण विभागाचे अपर निबंधक राजेश जाधवर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार किशोर दराडे, माजी आमदार दत्तात्रेय सावंत, नाबार्डचे जनरल मॅनेजर प्रदिप पराते, जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप, जिल्हा विशेष लेखा परिक्षक यु. जी. तुपे, प्रदिप अपसुंदे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, संस्थाचे ज्येष्ठ पदाधिकारी शंकरराव म्हात्रे, ठाणे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणकुमार गोंधळी, आदर्श नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील, कमळ नागरी सहकारी पतंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपूळे, कामरान शेख, इमरान अन्सारी, बँकेच सर्व संचालक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, महिला वर्ग व बँकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप जगे तर आभार बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी शाजी के. व्ही यांनी सांगितले, विविध कार्यकारी संस्थाचे कामकाज पारदर्शक करण्यासाठी संगणकीकरणाचा उपक्रम हाती घेतला. संगणकीकरणामुळे कामकाजात अमुलाग्र बदल होऊन ते कामकाज अधिक गतीमान होण्यास मदत राहणार आहे. राज्यासह देशातील सर्व संस्थांचे एकत्रीकरण करण्याचा उद्देश समोर ठेवून काम केले आहे. खेड्यापाड्यात वेगवेगळे उपक्रम राबवून गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. गावातील प्रगती अधिक गतीमान व्हावी या अपेक्षेतून हा उपक्रम राबविण्यात आला. रायगड जिल्हा बँकेने खुप चांगल्या पध्दतीने या उपक्रमात सहभाग घेऊन संस्था संगणकीकरण करण्यामध्ये बहूमान मिळाला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील चेअरमन, संचालक, कर्मचारी यांचे सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात आणखी वेगळ्या पध्दतीने उपक्रम राबविण्याचा प्रयत्न राहणार आहे. ग्रामीण भागातील 30 टक्के मंडळी शहरात व 70 टक्के मंडळी गावांमध्ये राहत आहेत. या गावांतील जनतेला उत्पन्नाचे साधन खुले व्हावे यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सुरु केले जाणार आङेत. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाला चांगला भाव मिळावा. शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे, असे शाजी म्हणाले.


बँक उंचीवर नेण्याचे योगदान कर्मचाऱ्यांचे
जयंत पाटील यांचे प्रतिपादनविविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचा संगणकीकरण कार्यपुर्तीचा सोहळा हा एक ऐतिहासिक क्षण आहे. यामध्ये सर्वांचे योगदान मोलाचे राहिले आहे. सहकारी संस्थासह बँकेतील कर्मचारी यांनीदेखील प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे आजचा हा दिवस रायगडसह जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या सन्मानाचा आहे. बँक वेगळ्या उंचीवर नेण्याचे योगदान कर्मचाऱ्यांचेदेखील आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

जिल्हा बँकेने शेतकरी, गरीबांना केंद्र बिंदू ठेवून काम केले आहे. या घटकाची उन्नती झाली पाहिजे, ही भुमिका आहे. त्यामुळे एक वेगळ्या उंचीवर बँकेचे कामकाज व सहकार नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संस्थाचे संगणकीकरण करण्यामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातील पहिली बँक ठरली याचा सार्थ अभिमान आहे. आज मिळालेले वैभव पैशापेक्षाही मोठे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
पुढे ते म्हणाले, रायगड जिल्हयात वीस हजार बचत गट आहे. या बचत गटांना उभारी मिळावी यासाठी बँकेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.
कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यावर काय बदल होऊ शकते. हे माझ्या कर्मचारी अधिकारी यांनी दाखवून दिले आहे. माझ्या कर्मचाऱ्याचा सन्मान म्हणजे माझा सन्मान आहे.
संस्थाचे एकत्रिकरण केले. नाबार्डचेदेखील चांगले मार्गदर्शन मिळाले. बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह महिलांबरोबरच जोडले गेलो आहोत. महिलांकडून कर्ज थकविले जात नाही. ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

जिल्हा बँकेचे आदर्शवत काम
उद्या दसरा आहे, खुप पवित्र दिवस आहे. आजचा उत्सव साजरा करीत आहोत, तो सहकारातून समृध्दीकडे असा आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्था संगणकीकरणाचे काम झाले आहे. राज्यात अनेक संस्था आहेत. परंतु जिल्हा बँकेकडून एक वेगळी अपेक्षा होती. त्यांनी ती अपेक्षा पुर्ण करून एक वेगळा आदर्श अन्य संस्थांसमोर ठेवला आहे. कर्मचाऱ्यांनीदेखील चांगले काम केले. योगेश यांचेसुध्दा चांगला सहयोग लाभला आहे. जिल्हा बँकेचे आदर्शवत कामकाज राहिले आहे, असे नाबार्डच्या सीजीएम रश्मी दराड यांनी प्रतिपादन केले.
–—
जिल्हा बँकेचे पाऊल दिशादर्शक
आजचा दिवस महत्वाचा व आनंदाचा आहे, असे बोलणे वावगे ठरणार नाही. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थाचे संगणकीकरण करून दिशादर्शक असे पाऊल बँकेने टाकले आहे. महिला बचत गट, सोसायटी यांचे एकत्रीकरण व संगणकीकरण करणे सोपे नाही, ते जिल्हा बँकेने करून दाखविले आहे. संगणकीकरणातून सोसायटीचे जाळे निर्माण करून संस्था बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनेकजण या सहकारी जोडले जाणार आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत संगणकीकरण केले जाणार ही अपेक्षा होती. ती अपेक्षा बँकेने पुर्ण करून पथदर्शक काम जिल्हा बँकेने केले आहे, असे राज्य सहकार निवडणूक आयुक्त अनिल कवडे यांनी गौरवोद्गार काढले.
–—
जयंत पाटील सहकारातील चालते बोलते विद्यापिठ
देशात, राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे बघण्याचा दृष्टीकोन इतका सकस नाही. परंतु अलिबागमधील शेतकऱ्यांची रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इतकी आधुनिक व कार्पोरेट असल्याचा आनंद वाटला. सहकाराबाबत चांगले ज्ञान असलेले जयंत पाटील हे चालते बोलते विद्यापिठ आहे. त्यांच्याकडे सहकार एक मॉडेल म्हणून करण्याची जिद्द आहे.हे बघून खूप समाधान वाटले. संस्था गतीमान व प्रगतीशिल व्हाव्यात हा दृष्टीकोन ठेवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काम करीत आहेत. जिल्हा बँक संगणकीकरण करण्यामध्ये देशात पहिली ठरली आहे. त्याचा खऱ्या अर्थाने अभिमान आहे. संगणकीकरणामुळे कामकाज सहज व सोपे होणार आहे. कामात पारदर्शकता राहणार आहे. त्यादृष्टीने पाऊल पडणार आहे. लेखा परिक्षणाचे कामकाज अधिक सूलभ होणार असल्याची माहिती लेखा परिक्षण विभागाचे अपर निबंधक राजेश जाधव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *